बारामती, २० जानेवारी २०२१: राज्यातील पदवीधर शिक्षकांच्या वेतन व पदोन्नतीचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेऊन यावेळी पदवीधर शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा केली. सातव्या वेतन आयोगामध्ये पदवीधर शिक्षकांना उपशिक्षकांपेक्षा कमी वेतन मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये २०१६ नंतर नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी दिली जात नाही.राज्यात सर्व पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी शिक्षक संघाने केली आहे.
मुख्याध्यापक तसेच जानेवारी १६ नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेल्या शिक्षकांचीही वेतनत्रुटी दूर करण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले. यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी ग्रामविकास, शालेय शिक्षण व नगरविकास विभागातील मंत्री व सचिव यांच्यासोबत शिक्षक संघाची स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी शिक्षक संघास दिले असल्याची माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली. यावेळी झालेल्या बैठकीस शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, सांगली जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, बाळासाहेब झावरे, अविनाश गुरव,राजेंद्र जगताप यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव