वादग्रस्त शिक्षणसंस्थांमध्ये प्रशासकांची नेमणूक करण्याची विधानसभेत मागणी

नागपूर, २८ डिसेंबर २०२२ : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वासुंदे येथील भैरवनाथ शिक्षणप्रसारक मंडळाच्या श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयात महिला शिक्षिकेवर अन्याय व नियमबाह्य मान्यता शिक्षण विभागाने दिल्याचे वृत्त ‘न्यूज अनकट’च्या माध्यमातून नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याच धर्तीवर आज दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून अशा दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे; तसेच वादग्रस्त संस्थांमध्ये प्रशासक नेमण्याची मागणी करीत राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या विविध प्रश्नांना विधानसभेमध्ये वाचा फोडली. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण संस्थाचालक व शिक्षक यांच्यातील वादामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांना पदोन्नती, निवृत्तिवेतन मिळेपर्यंत अनेकवेळा त्रासाला सामोरे जावे लागते ते विचारात घेता ज्या शिक्षणसंस्थामध्ये अशा प्रकारचे वाद आहेत त्या ठिकाणी शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासक नेमावा. 

पुणे जिल्हा व राज्यातील अनेक संस्थांमधील शिक्षकांच्या पदांना बोगस मान्यता दिल्याच्या तक्रारी आढळून आलेल्या आहेत. याबाबत मूळ प्रस्ताव शिक्षण विभागाच्या कार्यालयात सापडत नाही, संबधित अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकत नसल्याचे चित्र आहे तेव्हा बोगस मान्यता दिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार राहुलदादा कुल यांनी विधानसभेमध्ये केली.

याबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री मा. ना. दिपकजी केसरकर साहेब यांनी दिले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : नीलेश जांबले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा