जळगाव २२ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्र विधीमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जळगाव शहरातील प्रलंबीत असललेल्या एमआयडीसी, कृषी विद्यापीठासह शहरातील ३०० फुटापर्यंतच्या मालमत्तांना घरपट्टी माफ करावी या मागण्यांसाठी शहराचे आमदार सुरेश भोळे, मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी उद्धव बाहासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, राज्याचा अर्थसंकल्प येऊ घातला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विस्तारीत एम.आय.डी.सी.चा प्रश्न या अर्थसंकल्पात मार्गी लावत भूमिसंपादनासाठी, अर्थसंकल्पात तरतूद करावी. एम.आय.डी.सी. विस्तारली तर अनेक उद्योग येतील, शहरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, पुरक व्यवसाय सुरु होतील. आमदार एकनाथ खडसे कृषी मंत्री असतांना राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा प्रस्ताव आला होता. यासाठी नियुक्त समितीने जळगावात नवीन कृषी विद्यापीठ व्हावे अशी शिफारस केली होती. त्यासाठी जळगाव शहरालगत शिरसोली भागातील जागाही निश्चित केली होती. मात्र त्यांचे मंत्रीपद गेल्यापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यास चालना देत विद्यापीठ मंजूर करावे. अशी मागणी त्यांनी केली.
भाजपाने महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत ३०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या रहिवासी मालमत्तांची घरपट्टी माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्याबाबतचा ठराव उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने केला. मात्र या प्रस्तावास मनपा प्रशासनाने विरोध करत पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर पारीत ठराव राज्य सरकारकडे विखंडनासाठी पाठविला आहे. तो विखंडीत न होता शासनाकडून मंजुर व्हावा यासाठी शहराचे आमदार सुरेश भोळे आणि राज्याचे भाजपाचे वरीष्ठ मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न करून शहरात विकासाचे नवे पर्व सुरू करावे अशी विनंती आणि मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन यांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : पंकज पाटील