मुंबई, दि. २६ जून २०२०: राज्यात आतापर्यंत कोविड -१९ ची चाचणी करण्यासाठी अँटीजेन पद्धत वापरली जात होती. आता त्याचबरोबर राज्य सरकारने अँटीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोविड -१९ मुळे प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रांमधील किती नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे ते या चाचणीच्या माध्यमातून कळू शकेल.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माहिती दिली यावेळी ते म्हणाले की, “मृत्यू दर रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात दररोज सुमारे २० हजार चाचण्या केल्या जात आहेत. ॲण्टीजेन आणि ॲण्टीबॉडी चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी ३० दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्के आहे. कोरोना बरोबर जगण्यासाठी एसएमएस ही त्रिसुत्री अंगीकारावी लागेल. यातील एस म्हणजे सोशल डिस्टसिंग, एम म्हणजे मास्क आणि एस म्हणजे सॅनिटायजरचा वापर करणे.”
खाजगी रुग्णवाहिकांकडून होणारी रुग्णांची पिळवणूक थांबणार
खाजगी रुग्ण वाहिनी प्रदात्याकडून रुग्णांची अमाप लूट केली जात होती. यासंदर्भात अनेक रूग्णांनी तक्रारीदेखील केल्या होत्या. याची दखल घेत आरोग्य विभागामार्फत एक समिती नेमण्यात आल्याचे देखील राजेश टोपे यांनी या फेसबुक लाईव्हच्या आधारे सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, ” प्रत्येक जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णवाहिकांची यादी केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त या रुग्णवाहिका ताब्यात घेतील आणि त्यांचे प्रति किमी दर निश्चित केले जातील. त्यानुसार रुग्णांकडून दराची आकारणी होईल. निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी झाल्यास परवाना रद्द करण्यात येईल. सामान्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.”
रेमडेमीसीवीर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा प्रत्येक जिल्ह्यात होणार उपलब्ध
रेमडेमीसीवीर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा या औषध बाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, “कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेमीसीवीर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे मागणी केली. त्यानुसार आता राज्यात जून महिन्याच्या अखेरीस ही औषधे प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होतील.”
न्यूज अनकट प्रतिनिधी