जालन्यातून १२०० मजूरांचे विशेष रेल्वेने गावाकडे प्रस्थान

जालना, दि.११ मे २०२०: जालना औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय कामगारांच्या घर वापसीसाठी सुरु झालेल्या प्रयत्नातून रविवारी(दि.१०) रोजी सुमारे बाराशे कामगार एका विशेष रेल्वेमधून उत्तर प्रदेशातील उन्नावच्या दिशेने रवाना झाले आहेत.

जालना औद्योगिक वसाहतीत अनेक कारखान्यात राज्यभरासह परप्रांतीय मजूरही मोठ्या प्रमाणात काम करतात. लाॅकडाऊन सुरु झाल्यानंतर या मजूरांची कामाअभावी हाल सुरु झाल्याने व काबाडकष्ट करुन जमवलेली पुंजी देखील संपत असल्याने अनेक मजूरांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला.

परंतू प्रशासकिय पासेससाठीची गुंतागुंतीची प्रक्रिया व कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसल्याने अनेकांना पायपीट करीत हजारो किमींचा प्रवास सुरु केला. तर काही कंपनी संचालकांनी कामगारांच्या काळजीपोटी प्रशासकिय मान्यता घेऊन खाजगी बसद्वारे काही परप्रांतीय मजूरांना स्वगृही पाठवले.

परंतू कामगारांची संख्या व प्रशासकिय मान्यतेचा वेग यात वेळीच समन्वय साधला न गेल्याने काही कामगार कोरोना संकटाच्या धास्तीने व हाताला काम नसल्याच्या उद्विग्नतेतून घरांच्या दिशेने पायी निघाले.

यातच जालना येथील एका कारखान्यातून रेल्वे पटरीने पायी निघालेल्या १९ पैकी १६ कामगारांचा करमाडजवळ रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यानंतर मात्र सरकारसह जिल्हा प्रशासनाला जाग आली आणि जालना येथून परप्रांतीय मजूरांना स्वगृही पाठवण्यासाठी विशेष रेल्वेच्या हालचाली सुरु झाल्या. त्याचाच भाग म्हणुन रविवारी (दि.१०) जालना रेल्वे स्थानकावरुन एका विशेष रेल्वेद्वारे सुमारे बाराशे कामगारांना उत्तर प्रदेशातील उन्नावच्या दिशेने रवाना करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा