उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण…?

मुंबई, २२ ऑक्टोंबर २०२०: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार होम क्वॉरन्टाईन झाले आहेत. सुरुवातीला त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र पुन्हा त्यांची स्वॅब चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्या प्रकृतीविषयी चर्चा रंगल्या होत्या. अजित पवारांना थोडा ताप असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती, ती निगेटिव्ह आली होती. परंतु पुन्हा करण्यात आलेल्या चाचणीमध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांनी यासंदर्भात बातमी दिली आहे.

मात्र अद्याप अजित पवारांनी याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळं प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाणार होता. मात्र अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळेच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलल्याची माहिती आहे.

परतीच्या पावसाने राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. याची पाहणी करण्यासाठी अजित पवार पुणे, इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना थोडा थकवा जाणवत होता. अजित पवारांनी शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पुरामुळे बाधित झालेले रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा