सांगली, २२ सप्टेंबर २०२३ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका आज खानापूर मतदारसंघातील लोकांना अनुभवायला मिळाला. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी अजित पवारांना खानापूर मतदार संघातील पाणी टंचाईच्या परिस्थितीबाबत भेटून माहिती दिली होती. या भेटीला ४८ तास होतात न होतात तोच शासनाकडून तब्बल ३६ गावांमध्ये टंचाई घोषित करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी १९ सप्टेंबरला भेटून खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कल मध्ये शेतीसाठी टेंभू आणि तरकारी योजनेतून पाणी सोडण्याची व्यवस्था, पिण्यासाठी पाणी टँकर, जनावरांसाठी चारा छावणी, चारा डेपो सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय होण्यासाठी संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती करणारे पत्र दिले होते.
या घटनेच्या पुढच्या ४८ तासांत विट्याचे प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल यांनी वैभव पाटील यांना एक पत्र दिले आहे. या पत्रात खानापूर मतदार संघामध्ये चारा छावणी, चारा डेपो आणि पाणी व्यवस्था करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले होते, त्यावर तात्काळ कार्यवाही करत खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील अनुक्रमे १४ आणि २५ गावांमध्ये टंचाई घोषित करण्यात आलेली आहे,असे कळवले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर