सीबीआय चौकशीला जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नवे ट्विट; म्हणाले…

नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर २०२२: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी धोरण प्रकरणात सीबीआयने समन्स बजावले आहे. त्यांना आज सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच दिल्ली पोलिसांकडून उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या सरकारी निवासस्थानाभोवती कलम १४४ लागू करण्यात आले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

दरम्यान, मनीष सिसोदिया यांनी चौकशीला उपस्थित राहण्यापूर्वी एक ट्विट करत भाजपवर हल्ला केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझ्या विरुद्ध खोटी केस तयार करून मला अटक करण्याची तयारी केली जात आहे. येणार्‍या काही दिवसात निवडणूक प्रचारासाठी मी गुजरातमध्ये जाणार होतो. हे लोक गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हरत आहेत, त्यामुळे गुजरात मध्ये मी प्रचारासाठी जाऊ नये यासाठी मला यामध्ये अडकवले जात आहे.

पुढे ते म्हणाले, मी प्रत्येक वेळी गुजरातमध्ये गेलो तेव्हा गुजरातच्या लोकांना सांगितले की तुमच्या मुलांसाठी गुजरातमध्येही आम्ही दिल्लीसारखी अप्रतिम शाळा बनवू. लोक खूप आनंदी आहेत. पण गुजरातमध्येही चांगल्या शाळा व्हाव्यात, गुजरात च्या लोकांनी शिकून प्रगती करावी, अशी या लोकांची इच्छा नाही असा आरोप देखील त्यांनी यावेळी भाजपवर केला आहे.

माझ्या तुरुंगात जाण्याने गुजरात निवडणुकीचा प्रचार थांबणार नाही. आज प्रत्येक गुजराती उभा राहिला आहे. गुजरातची पोरं आता चांगल्या शाळा, हॉस्पिटल, नोकरी, वीज यासाठी प्रचार करत आहेत. गुजरातमध्ये येणारी निवडणूक ही एक ‘चळवळ’ असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा