नागपूर : देशात दरवर्षी सरासरी ५ लाख अपघात होतात. या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची सरासरी आकडेवारी दिड लाखांपेक्षा जास्त आहे’, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली.
केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नागपूरमध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात बोलत होते. देशभर एकाचवेळी सुरू करणाऱ्या या जनजागृती कार्यक्रमांची १७ जानेवारीला सांगता होणार आहे.
यावेळी गडकरी म्हणाले की, देशात दरवर्षी होणाऱ्या अपघातात ३ लाख लोक जखमी होतात. अशा अपघातांमुळे देशाचा जीडीपी २ टक्क्यांनी कमी होतो. सरकारकडून अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात असतानाही अपघातांचे प्रमाण कमी होत नाहीत. अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या ६२ टक्के पीडितांचे वय १८ ते ३५वर्षे गटातील होते.
तामिळनाडूने राज्यात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण २९ टक्क्यांनी कमी, तर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्यादेखील ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. अशात लोकांना वाहतूक सुरक्षा नियम आणि उपाय सांगण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) आणि समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन जनजागृती मोहिमा राबवावी, असेही गडकरी म्हणाले.