कोविड-१९ चा भारतातील आत्तापर्यंतचा तपशील

नवी दिल्ली, दि. ११ मे २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पाचवी बैठक ११ मे २०२० रोजी दुपारी ३ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी ३ वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पाचवी बैठक घेणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने ट्वीटर वर म्हटले आहे.

संपूर्ण जगभरामध्ये कोविड-१९ महामारीचा उद्रेक झाला आहे, या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने इतर देशांसाठीही अनेक उपाय योजना केल्या आहेत आणि मदतीचा हात दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे भारतीय नौदलाचे ‘केसरी’ हे जहाज इतर देशांसाठी मदत सामुग्री घेवून आज रवाना झाले. मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मॅडागास्कर आणि कॉमोरोस या देशांना मदत पुरवण्यासाठी‘केसरी’ जहाज रवाना झाले. या जहाजातून अन्नसामुग्री, कोविड-१९ महामारीवर उपयोगी ठरत असलेल्या एचसीक्यू औषधाच्या गोळ्या आणि विशेष आयुर्वेदिक औषधे तसेच वैद्यकीय सहाय्यकांचे पथक आज पाठवण्यात आले. या देशांशी असलेले दृढ ऋणानुबंध लक्षात घेवून भारताने ‘मिशन सागर’ सुरू केले आणि मदत सामुग्री पाठवली आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-१९  घडामोडींवरील माहिती:

देशात कोविड-१९ व्यवस्थापनासाठी पुरेशा आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत. कोविड-१९ प्रकरणांच्या  व्यवस्थापनासाठी समर्पित सार्वजनिक आरोग्य सुविधा खालीलप्रमाणे तीन श्रेणींमध्ये विभागल्या आहेत:

श्रेणी १  समर्पित कोविड हॉस्पिटल (डीसीएच): समर्पित कोविड रुग्णालये  प्रामुख्याने ज्यांचे वैद्यकीयदृष्ट्या गंभीर असे निदान झाले आहे त्यांना व्यापक सेवा पुरवतात. आयसीयू, व्हेंटिलेटर आणि  ऑक्सिजन मदतीसह बेड या सुविधांनी ही रुग्णालये  सुसज्ज असतात. या रुग्णालयांमध्ये संशयित आणि बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग असतात.  समर्पित कोविड आरोग्य केंद्रे आणि कोविड सेवा केंद्रांसाठी समर्पित कोविड रुग्णालये संदर्भ( रेफरल) केंद्र म्हणून काम करतील.

श्रेणी २ समर्पित कोविड आरोग्य केंद्र  (डीसीएचसी): समर्पित कोविड आरोग्य केंद्र ही अशी रुग्णालये आहेत जी वैद्यकीयदृष्ट्या सौम्य लक्षणे असलेल्या सर्व रुग्णांची काळजी घेतात. समर्पित कोविड आरोग्य केंद्रात  संशयित आणि बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग असतात. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सुविधा असलेले सुसज्ज  बेड असतील. प्रत्येक समर्पित कोविड आरोग्य केंद्र एक किंवा अधिक समर्पित कोविड रुग्णालयांशी जोडलेले आहे.

श्रेणी ३ समर्पित कोविड सेवा केंद्र (डीसीसीसी): कोविड सेवा केंद्र केवळ अशाच रुग्णांची काळजी घेऊ शकतात जे वैद्यकीयदृष्ट्या सौम्य किंवा अति सौम्य  किंवा कोविड संशयित रुग्ण आहेत. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमार्फत वसतिगृह, हॉटेल, शाळा, स्टेडियम, लॉज इत्यादी सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही ठिकाणी या अस्थायी सुविधा उभारल्या जाऊ शकतात. या सुविधांमध्ये संशयित आणि बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग असतील. प्रत्येक समर्पित कोविड सेवा केंद्र रेफरल उद्देशासाठी एक किंवा अधिक समर्पित कोविड आरोग्य केंद्र आणि कमीतकमी एक समर्पित कोविड हॉस्पिटलशी जोडलेले आहे.

१० मे पर्यंत सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये ४८३ जिल्ह्यांमध्ये ७७४० सुविधा आहेत. ज्यात राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारची रुग्णालये आणि सुविधा समाविष्ट आहेत. एकूण ६,५६,७६९ अलगीकरण खाटा असून बाधित रुग्णांसाठी ३,०५,५६७ खाटा, संशयित रुग्णांसाठी ३,५१,२०४ खाटा,  ९९,४९२ ऑक्सिजनने  सुसज्ज खाटा तर ऑक्सिजन सह १,६९६ सुविधा आणि ३४,०७६ आयसीयू बेड आहेत.

सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक माहितीसाठी त्यांच्या संकेतस्थळांवर  तीन प्रकारच्या कोविड समर्पित सुविधा अधिसूचित आणि अपलोड करण्याची विनंती केंद्र सरकारकडून  करण्यात आली आहे. ३२ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या संकेतस्थळांवर / सार्वजनिक माहिती मंचावर याआधीच माहिती अपलोड केली आहे आणि अन्य ते करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) येथे कोव्हीड-१९ चाचणी क्षमता आणखी वाढवण्याची गरज लक्षात घेऊन अधिकारप्राप्त गट  २ च्या शिफारशीनुसार उच्च प्रक्रिया यंत्र  खरेदीला मान्यता देण्यात आली. आता एनसीडीसीमध्ये कोबास ६,८०० चाचणी मशीन यशस्वीरित्या उभारण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार एनसीडीसी दिल्ली, एनसीआर, लडाख, जम्मू-काश्मीर आणि इतर विविध राज्यांतील नमुन्यांच्या चाचणीसाठी सहाय्य पुरवत आहे. सध्या एनसीडीसीमध्ये दररोज चाचणी क्षमता सुमारे ३००-३५० इतकी आहे. कोबास ६,८०० या  २४ तासात सुमारे  १२०० नमुन्यांची चाचणी घेण्याची क्षमता असलेल्या यंत्रासह एनसीडीसीमध्ये कोविड -१९ चाचणी क्षमता लक्षणीयरित्या वाढविण्यात आली आहे.

आतापर्यंत एकूण १९,३५७ लोक बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत १,५११ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर ३०.७६% वर गेला आहे.  बाधित रुग्णांची संख्या ६२,९३९ आहे. भारतात कोविड-१९ बाधित रुग्णांमध्ये ३,२७७ ची वाढ नोंदली गेली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा