मुंबई : राज्यात सध्या सत्तासंघर्षाचा तिढा न सुटल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला संपुष्टात आल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची ‘काळजीवाहू’ म्हणून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. राष्ट्रपती राजवट लागू होताच त्यांनी ट्विटर हँडलवरचे आपल्या नावापुढील ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ पद काढून ‘महाराष्ट्राचा सेवक’ असे नमूद केले आहे.
शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास नकार दिला होता. त्यामुळे बहुमतासाठीचे संख्याबळ नसल्याने भाजपने सरकार बनविण्यास असमर्थ असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्पष्ट केले होते. त्यानंतर कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना बोलावून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहण्यास सांगितले होते. त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर वॉलवर मुख्यमंत्रीपदापुढे ‘काळजीवाहू’ हा शब्द लिहिला होता.