भाविकांना केवळ मिळणार ऑनलाईन दर्शन, भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाचा निर्णय…

पुणे, ११ ऑगस्ट २०२०: येत्या २२ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सव म्हटलं की पुणे हे प्रकर्षाने डोळ्यासमोर येते. मनाला भावणारे असे वेगवेगळे देखावे करून पुण्यातील गणेशोत्सव मंडळे श्रींची प्रतिष्ठापना करत असतात. मुळात गणेशोत्सवाची सुरुवातच पुण्यातून झाली आहे. परंतु, यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट पसरले आहे. सरकारनेदेखील गणेश उत्सव साजरा करण्याबाबत नियमावली जाहीर केली आहे. याला प्रतिसाद देत गणेशोत्सव मंडळाने देखील आता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात काल पुण्यातील प्रसिद्ध ‘दगडूशेठ हलवाई गणपती’ या मंडळाने देखील गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यापाठोपाठ आज ‘भाऊ रंगारी गणेशोत्सव’ मंडळाने देखील कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. भाऊ रंगारी गणपतीचे दर्शन आता यावर्षी भाविकांना केवळ ऑनलाइन घेता येणार आहे. मंडळाने यावेळेस भाविकांसाठी मंडपामध्ये दर्शनास मनाई केली आहे. उत्सव प्रमुख पुनित बालन यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यंदा मंडळाने कोणताही देखावा किंवा कार्यक्रम मंडळाच्या आवारात आयोजित केले नसले तरीही ऑनलाइन सेवेमधून भाविकांना दहा दिवस वेगवेगळे मनोरंजन उपलब्ध करून दिले आहे याबाबत माहिती देताना पुनीत बालन म्हणाले की, “आजवर प्रत्येक वर्षी आपण सर्वानी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला गेला आहे. मात्र यंदाच्या वर्षी आपण प्रथमच गणेश उत्सवासह इतर सण साध्या पद्धतीने साजरे करीत आहोत. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवामध्ये भाविकांना घरबसल्या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये सुप्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांची वैविध्यपूर्ण संगीत मैफल अनुभवता येणार आहे.”

आपल्या दहा दिवसांच्या उत्सवाचे स्वरूप स्पष्ट करताना पुढे ते म्हणाले की, “शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या खास गायकीचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. आंतराष्ट्रीय किर्तीचे तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे, बासरीच्या मंजूळ स्वरांनी रसिकांना मोहित करणारे प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांची जुगलबंदी अविस्मरणीय ठरणार आहे. याशिवाय सुप्रसिद्ध गायक, संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी यांची सुगम आणि मेलडियस गाण्यांची श्रवणीय मैफल रंगणार आहे. सुप्रसिद्ध लोककलावंत नंदेश उमप आणि गणेश चंदनशिवे हे या सांस्कृतिक महोत्सवात लोककलेचे, लोकगीतांचे विविध रंग उलगडणार आहेत.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा