मुंबई २१ फेब्रुवारी २०२५ : राजकीय नेते धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी या आजाराची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. सध्या त्यांच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेल्स पाल्सी हा आजार चेहऱ्यावरील स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूचा विकार आहे.
बेल्स पाल्सी म्हणजे काय?
बेल्स पाल्सी हा चेहऱ्यावरील स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूला होणारा विकार आहे. या विकारामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला अशक्तपणा किंवा अर्धांगवायू होऊ शकतो, ज्यामुळे चेहऱ्यावर हसू किंवा हावभाव करणे कठीण होऊ शकते. हा विकार अचानक होतो आणि त्याच्या लक्षणांमध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला वाकलेपणा, तोंडाच्या एका बाजूने लाळ येणे, डोळा बंद करण्यात अडचण येणे इत्यादी समाविष्ट असतात.
बेल्स पाल्सी होण्याची कारणे
बेल्स पाल्सी विषाणूजन्य संसर्ग, ताणतणाव, झोपेची कमतरता, गंभीर दुखापत, किंवा मानसिक दडपणामुळे होऊ शकतो. याशिवाय, मधुमेह, इतर आरोग्य समस्या, आणि मीठाच्या जास्त सेवनामुळेही या आजाराची शक्यता असते. अधिक प्रमाणात मीठाचे सेवन रक्तदाब वाढवू शकते, ज्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो आणि स्ट्रोक हे चेहऱ्यावरील पक्षाघाताचे मुख्य कारण ठरू शकते.
लक्षणे आणि उपचार
बेल्स पाल्सीच्या लक्षणांमध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला अशक्तपणा, कानाच्या मागे अस्वस्थता, चेहऱ्याचा वाकलेपणा, डोळा बंद करण्यात अडचण, आणि चेहऱ्यावरील स्नायूंवर नियंत्रण न होणे यांचा समावेश होतो. हे लक्षणे बहुतेकदा २ ते ३ दिवसांत दिसू लागतात आणि तीन आठवड्यांत लक्षणांमध्ये सुधारणा दिसते. काही लोकांना उपचारानंतरही चेहऱ्यावरील काही लक्षणे राहू शकतात. दखल घेणारा मुद्दा म्हणजे, बेल्स पाल्सीचे लक्षणे अधिक वेळ थांबू शकतात, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणं आवश्यक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, ऋतुजा घनवट