Dhangekar Flexes Against MLA (सोशल मीडिया वायरल न्यूज): कसब्यात महायुतीमध्ये बिघाडी झाली असून, आमदार हेमंत रासने यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत आव्हान दिल्याचे दिसत आहे. धंगेकर यांनी शिवसेना प्रवेशानंतर भाजपचे आमदार हेमंत रासने यांच्या विरोधात फ्लेक्सबाजी करत एकप्रकारे आव्हान दिले आहे.
कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात युतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत रवींद्र धंगेकर यांनी राज्यकर्त्यांना चांगलाच दणका दिला होता. या विजयामुळे धंगेकर यांची सर्वत्र क्रेझ निर्माण केली होती. त्यानंतर काँग्रेसने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. पुन्हा विधानसभेला संधी दिली. यात हेमंत रासने यांनी पोटनिवडणुकीतील पराभवाची परतफेड करत धंगेकर यांचा पराभव केला.
रवींद्र धंगेकर यांनी नुकताच काँग्रेसला रामराम करत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यामुळे त्यांचे व महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांशी असलेले मतभेद व वाद मिटतील का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या.
आता त्याची प्रचिती येत आहे. धंगेकर यांचे पक्षांतर झाल्यानंतरही भाजप व राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार) पक्षातील नेत्यांसोबत असलेले मतभेद तीव्र होत आहेत.
भाजपच्या नेत्यांनी पूर्वीचे वाद मिटणार नाहीत, असे स्पष्ट केले. तर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी जाहीरपणे धंगेकर यांच्यावर टीका करत, जुने वाद मिटणार नसल्याचे स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्यासमोर जनतेच्या मनातील आमदार असे होर्डिंग लावले होते. त्यानंतर आता धंगेकर यांच्या नावाने कसबा मतदारसंघात फ्लेक्स झळकत आहेत.
फ्लेक्सवर काय ?


माझ्या कसबा विधानसभेतील नागरिकांना नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणार, असं आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांनी मते घेतली. आता प्रत्यक्षात मात्र, घरोघरी पाण्याचे मीटर बसवून त्यांच्याकडून अन्यायकारक पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. कसब्यातील सुज्ञ जनता त्यासोबत झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे