धाराशिव १० नोव्हेंबर २०२३ : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर, वाहने अडवून दरोडा घालणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात धाराशिव पोलिसांना यश आलंय. नवीन दुचाक्या घेऊन म्हैसूर वरून राजस्थानला जाणाऱ्या एक कंटेनर मधील ७ गाड्या आणि ड्रायव्हरच्या खिशातील सत्तावीस हजारांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्या प्रकरणी, धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासात आरोपींना गजाआड केले आहे. आरोपींकडून दरोड्यातील ऐवज आणि दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर टोळीवर या आधीही अशाच प्रकारचे गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आलीय.
या बाबतची अधिक माहिती अशी की, इंदापुर शिवारात वाहतुक करणाऱ्या एका कंटेनर चालकाच्या गळयाला चाकु लावुन, रोख रक्कम २७ हजार रुपयेसह ७ दुचाक्यांची चोरी करणाऱ्या टोळीला २४ तासात पकडण्यात पोलीसांना यश आलय. नवाससोदीन शाहिद खान, वय २८ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मुहर्रया, ता. नौगढ़ जि. सिध्दार्थनगर राज्य उत्तरप्रदेश, हे कपुर डिझेल्स कंपनीचे कंटेनर मध्ये टि.व्ही.एस कंपनीच्या अपाचे मॉडेलच्या ४० गाड्या भरुन म्हैसुर राज्य कर्नाटक येथुन जयपुर, राजस्थान येथे घेवून जात होते. दरम्यान दि.०४.११.२०२३ रोजी रात्री ०७.३० वाजण्याच्या सुमारास इंदापुर शिवारातील बंद असलेल्या नरसिंह साखर कारखान्या समोर, एनएच ५२ रोडवरील सर्व्हिस रोडलगत कंटेनर उभा करून नयाससोद्दीन खान हे बाथरूमला जावून आले. तेंव्हा अचानक आलेल्या अनोळखी आठ ते नऊ व्यक्तींनी नयाससोद्दीन खान यांना लाथाबुक्यांनी व काठ्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या गळ्याला चाकु लावून खिशातील रोख रक्कम २७,००० तसेच कंटेनर मधील टि.व्ही.एस कंपनीच्या ७ मोटरसायकल प्रति मोटरसायकल ९०,७४२२ प्रमाणे असे एकुण ६,६२,१९४१ माल जबरदस्तीने काढून घेतला आहे. त्यानंतर फिर्यादी नयाससोद्दीन खान यांनी दि.०५.११.२०२३ रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन वाशी पोलीस ठाणे येथे गुरनं ३२९ / २०२३ कलम ३९५, ३९७ भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे व पोलीस अधिकारी व अमलदार यांचे पथकास योग्य ते मार्गदर्शन करुन सदर पथके रवाना केली. सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाची पाहाणी करुन गुन्हा करण्याच्या पध्दतीवरुन सदरचा गुन्हा खामकरवाडी पारधी पिढी येथील सराईत गुन्हेगार यांनी केल्याची खात्री पोलिसांना झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी खामकरवाडी येथे जवून तेथील आरोपी १) दिपक उर्फ बबड्या रमेश काळे, २) दादा लाला पवार दोघेही रा. खामकरवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांना ताब्यात घेवून त्यांचे कडे नमुद गुन्ह्याविषयी सखोल चौकशी केली असता सदर गुन्हा आम्ही दोघांनी व आमचे इतर ७ साथीदारांनी केला आहे, अशी त्यांनी कबुली दिली. सदर आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या टि.व्ही. एस कंपनीच्या आपाची मॉडेलच्या ७ मोटरसायकली प्रति मोटरसायकल किंमत ९०,७४२ प्रमाणे असा एकुण ६,६२,१९४१ चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही वाशी पोलीस ठाणे येथे हजर केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, शैलेश पवार, पोलीस उप निरीक्षक संदीप ओहोळ, सहाय्यक फौजदार वलीउल्ला काझी, पोलीस हावलदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, विनोद जानराव, फराहान पठाण, समाधान वाघमारे, पोलीस नाईक- नितीन जाधवर, बबन जाधवर, पोलीस अमलदार रविंद्र आरसेवाड, चालक पोलीस हावलदार सुभाष चौरे, महेबुब अरब, चालक पोलीस अंमलदार नितीन भोसले यांचे पथकाने केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख