पुणे, २७ नोव्हेंबर २०२२ : कोकण ही देवभूमीच. कोकणला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य जसे कमालीचे आहे तशीच कोकणला लाभलेली खाद्यसंस्कृती तितकीच समृद्ध आहे. कोकणात घरोघरी लग्न, पूजा, उत्सवाला खास पदार्थ आवर्जून बनवले जातात. कोकण म्हटले, की समुद्रकिनारा आला आणि जेवणात भात आणि माशाचं कालवण अहाहा! सोबत सोलकढी म्हणजे स्वर्गच जणू!
‘न्यूज अनकट’च्या टीमबरोबर नुकतेच चार दिवस कोकण दौऱ्यावर गेलो असता, कोकणची खडानखडा माहिती असलेले सहकारी विलास कोंढाळकर यांनी सावंतवाडी येथे कोळंबी खाण्याचा आणि सोलकढी पिण्याचा आग्रह केला असता, त्यांच्या आग्रहाला मान देऊन पहिल्यांदाच कोळंबी आणि सोलकढीचा आस्वाद घेतला; पण त्यापैकी मला सर्वांत अधिक आवडलेली ती सोलकढी. त्यानंतर कोकणात असताना दोन-चार वेळा जेवणानंतर पाचक, आरोग्यदायी सोलकढीचा आस्वाद घेतला. आणि सोलकढीविषयी हॉटेलचालक विजयकुमार पवार, तसेच नागरिक प्रथमेश साळवी, कृष्णा पाटील यांच्याकडून अधिक जाणून घेतल्यानंतर कोकणातील सोलकढीचे आहारातील महत्त्व जाणवले.
सोलकढी आणि कोकम पेय (कोकम फळापासून बनवलेले). ते पाचक पेय म्हणून कोकणात जेवणानंतर दिले जाते. कारण चमचमीत जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सोलकढी पिऊन ढेकर दिल्याशिवाय जेवणाची सांगताच होत नाही. त्यामुळेच, की काय मासळी, आंबा, फणस यांच्याबरोबर कोकमही कोकणचा कायम लक्षात राहणारा अविभाज्य घटक आहे.
सोलकढी हा कोकणी पदार्थ असला तरी आता महाराष्ट्राच्या सर्व भागांत साधारणपणे सोलकढी केली जाते. नारळ आणि कोकम यांचे उत्पादन कोकणात जास्त प्रमाणात होत असल्याने तिथल्या पारंपरिक पदार्थांबरोबर सोलकढी आवर्जून प्यायली जाते. चवीला आंबट गोड आणि भरपूर पोषक तत्त्व असणारी ही सोलकढी आरोग्यासाठीही तितकीच चांगली असते. कोकणात सगळ्या ऋतूंमध्ये सोलकढी प्यायली जात असली, तरी उन्हाळ्यात मात्र तहान शमविण्यासाठी आणि तोंडाला चव येण्यासाठी सोलकढी आवर्जून प्यायली जाते. कोकममध्ये ॲंटीऑक्सिडंट, डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक असतात.
सोलकढी पिण्याचे फायदे :
१) पचायला जड आणि चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी सोलकढी प्यायल्याने पोटाला आराम मिळतो.
२) हृदयविकाराचा धोकाही आटोक्यात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे जेवणानंतर मधुमेहींनी प्रमाणात सोलकढी पिणं फायदेशीर आहे.
३) उन्हाळ्यात डीहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी सोलकढी हे उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. शरीरातील उष्णता, पित्त शमवण्याची क्षमता सोलकढीत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मधल्या वेळेला किंवा जेवणानंतर सोलकढी पिणं अधिक फायदेशीर आहे.
४) अनेकदा लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही जंताची समस्या उद्भवते. ही समस्या कमी करण्यासाठी सोलकढी फायदेशीर ठरते. यातील ॲंटीऑक्सिडंट्स घटक ॲलर्जीचा धोका कमी करण्यास मदत करतात.
५) सोलकढीमध्ये आलं-लसणाची फोडणी असल्याने सर्दी, मळमळ, पचनक्रियेत बिघाड झाल्याने वाढणारी अस्वस्थता कमी होते; तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास सोलकढी फायदेशीर असते.
६) त्वचेचे आरोग्य खुलवण्यास, त्वचा अधिक सतेज करण्यास आणि एजिंगची प्रक्रिया थोडी पुढे ढकलण्यास मदत होते. परिणामी चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाण कमी होते.
७) कोकममध्ये असणारे मिनरल्स रक्तातल्या साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यास, त्यामध्ये होणारा चढ-उतार आटोक्यात ठेवण्यास मदत करतात; तसेच हृद्यविकाराचा धोकाही आटोक्यात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे जेवणानंतर मधुमेहींनी प्रमाणात सोलकढी पिणं फायदेशीर आहे.
सोलकढी करायची कशी?
साहित्य :
१) ताज्या नारळाचं दूध, २) कोकम, ३) हिरवी मिरची, ४) कोथिंबीर, ५) लसूण, ६) साखर, ७) मीठ.
कृती :
१. एक कप ताज्या खोबऱ्याचे तुकडे आणि एक कप पाणी मिक्सरमधून काढा. या चोथ्याचे पाणी एका कापडातून गाळून घ्या. असे करायचे नसेल तर बाजारात मिळणाऱ्या रेडीमेड नारळाच्या दुधाचाही वापर करू शकता.
२. पाण्यात कोकम भिजवून त्याचा अर्क निघेल तो या दुधात घाला.
३. लसूण आणि मिरची आवडीनुसार बारीक ठेचून घाला. हे दोन्ही नको असेल तर नाही घातले तरी चालते.
४. साखर, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे मिश्रण गार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
५. काही वेळाने गारेगार सोलकढी जेवणासोबत प्यायला घ्या.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील