नवी दिल्ली : दिल्ली ते वाराणसी आणि माता वैष्णोदेवी कटरावास अशा दोन मार्गांवर ‘ट्रेन -१८’ म्हणजेच ‘वंदे भारत’ या अत्याधुनिक ट्रेनचे यशस्वी उद्घाटन करण्यात आले. आता चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीने १६ डब्यांच्या ४४ ‘वंदे भारत’ ट्रेन तयार करण्यासाठी इलेक्ट्रीस पार्ट्स व इतर साधन सामुग्रीसाठी टेंडर काढण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी या देशातील पहिल्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर दुसरी वंदे भारत ३ ऑक्टोबर २०१९ रोजी नवी दिल्ली ते वैष्णोदेवी मार्गावर सुरू करण्यात आली होती.
या नव्या ‘वंदे भारत’ आवृत्तीमध्ये मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या सुचनेनुसार प्रवाशांसाठी अधिक आरामदायी प्रवास करता यावा. तसेच ट्रेनचे ऑपरेशन अधिक खात्रीशीर व्हावे. यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
ही ट्रेन प्रवाशांच्या वेळेची २० टक्के बचत करेल. तसेच तिची यंत्रणा पाऊस तसेच पुरातही योग्य प्रकारे कार्यरत राहील याची काळजी घेण्यात आली आहे.
दिवसाच्या प्रवासासाठी योग्य
‘वंदे भारत’ ही २५ हजार व्होल्टवर धावणारी सेमी हायस्पीड ट्रेन असून तिचा वेग दर ताशी १६० कि.मी. इतका आहे. या ट्रेनला पुढे इंजिन जोडलेले नसून गाडीला मेट्रो ट्रेनप्रमाणे पुढे एअरो डायनामिक आकाराची मोटरमनची केबीन आहे. संपूर्ण ट्रेन वातानुकूलित आहे. तिला स्वयंचलित उघड-बंद होणारे दरवाजे आहेत. या गाडीचे डब्बे संपूर्ण चेअर कार असल्याने दिवसाच्या प्रवासासाठी योग्य असल्याने कमी अंतराच्या प्रवासासाठी तिचा वापर होणार आहे.