गोल पोस्ट गुन्हा दिराने केला भावजयीचा खून

दिराने केला भावजयीचा खून

पुरंदर, दि.२२ सप्टेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मौजे रीसे या गावातील एका व्यक्तीने आपल्या भावजयीचा खून केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार खून झालेल्या व्यक्तीची मुलगी हसीना नासीर मुलाणी हीने जेजुरी पोलिस स्टेशनला दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रीसे येथील मुबारक कादर सय्यद हा त्याची भावजय शबीरा जैनुद्दीन सय्यद (वय ४५) हिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत होता. परंतु ती त्यास तयार होत नसल्याने काल दिनांक २१/९/२०२० रोजी रात्रीचे जेवण झाल्यानंतर शबीरा खरकटी भांडी घासत असताना मुबारक कादर सय्यद याने घराची बाहेरची कडी लावून शबीराकडे गेला. त्यावेळी घरातून शबिराची मुलगी हसीना व घरातील लोकांनी मुबारकला तू काय करत आहेस? दरवाजा उघड म्हणून हटकले. परंतु त्याने दरवाजा उघडला नाही आणि त्याने पुन्हा शबीराकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यास तिने नकार दिल्याने मुबारक कादर सय्यद याने चिडून हातातील सुरीने शबीराच्या छातीवर, डाव्या हाताच्या मनगटावर, डाव्या पायाच्या मांडीवर, डाव्या पायाच्या घोट्यावर वार करुन तिचा खून केला. याबाबत शबीराची मुलगी हसीना मुलाणी हीने जेजुरी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.

जेजुरी पोलिसांनी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास  पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग,  उपविभागीय पोलिस अधिकारी पुरंदर भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने हे करत आहेत. घटनेनंतर आरोपी मुबारक कादर सय्यद हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी वेगवेगळी दोन पथके रवाना झाली असल्याची माहिती जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे.

error: Content is protected !!
Exit mobile version