उत्तर प्रदेश, दि.४ मे २०२०: सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. प्रत्येक जण कोरोनाचा सामना करत आहे. त्यामुळे जनतेने अधिकाधिक वेळ घरात राहून पोलीस व अन्य अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना मदत करावी, असे आवाहन केंद्र सरकारकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.
तसेच ज्या भागांमध्ये परिस्थिती हळूहळू सुधारत आहे, त्या भागांत केंद्र सरकारने अटी व शर्थींसह व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र आपल्या देशात अजूनही जात आणि धर्माच्या नावाखाली भेद भाव केल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेश मधून समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एका भाजप आमदारांनी मुस्लीम व्यक्तीकडून भाजी खरेदी करु नका असं जाहीर आवाहन केले होते. शिवाय त्याचे समर्थनही त्यानं केले होते. त्या दिवसानंतर लगेच मध्य प्रदेशमध्ये असणाऱ्या पेलमपूर गावात मुस्लीम व्यापाऱ्यांना गावात प्रवेश नाही असं पोस्टर आता झळकताना दिसत आहे. सोशल मिडियावर या पोस्टरची चांगलीच चर्चा सुरू आहे.
हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षातील काँग्रेस नेत्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत इंदौरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली आहे की, या पोस्टरची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ तिथे पोहचत हे पोस्टर हटवण्यात आले आहे. हे पोस्टर लावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी काय कारवाई होते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: