फलटण (जि. सातारा), १४ जानेवारी २०२३ : आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगामध्ये संगणकाचे महत्त्व जोपासणे ही काळाची गरज आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकत असून, आयटी क्षेत्राकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी आकर्षित होत असल्याचे मत जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले. आसू (ता.फलटण) येथील श्रीमंत निर्मलाराजे निंबाळकर खर्डेकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत लॅपटॉप वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अलाईन ऑटोमेशन, आयटी कंपनी, विमाननगर पुण्याचे रजनीश कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास श्रीमंत दिव्यांजलीराजे खर्डेकर, सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन प्रमोद झांबरे, आसू गावचे सरपंच महादेवराव सकुंडे, दशरथ शिरतोडे, माजी सरपंच पोपटराव सकुंडे, आसू नंबर एक विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे रवींद्र ढवळे, हनुमंतराव फडतरे, जगन्नाथ तामाने, किरण घाडगे, जहिरुद्दीन शेख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पुणे येथील अलाइन ऑटोमेशन, पुणे ही आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी कंपनी विमाननगर येथे असून, या कंपनीच्या वतीने श्रीमंत निर्मलाराजे खर्डेकर निंबाळकर हायस्कूलला तीन लॅपटॉप, सर लष्कर बाबाराजे खर्डेकर हायस्कूल, हनुमंतवाडी दोन लॅपटॉप आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आसू एक लॅपटॉप असे कंपनीच्या वतीने लॅपटॉपचे वाटप करण्यात आले.
आसू हे ग्रामीण भागातील एक विकासाच्या वाटेवरील गाव असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक सुखसुविधा या गावामध्ये मिळत असतात. पुणे येथील या कंपनीने घेतलेला निर्णय आसू गावातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम असून अलाइन ऑटोमेशन कंपनी, विमाननगर यांनी दिलेले लॅपटॉप हे विद्यार्थ्यांसाठी त्यांना भविष्यात प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बी. के. भोसले यांनी केले, तर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य चंद्रकांत किकले, पर्यवेक्षक बी. एस. नाळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार.