माढा, १६ ऑगस्ट २०२०: सोलापूर जिल्ह्यात सद्यस्थितीला युरीया खताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. पावसाने साथ दिल्याने शेतात पिके बाळसे धरू लागली आहेत. पिकांना युरीयाची गरज असतानाच जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यात युरीया मिळेना. यामुळे रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने उंदरगाव मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन युरीया खत पोहोच करण्यात आले.
लॉकडाउनच्या काळात शेतकरी उध्वस्त झालेला असताना आता त्याला युरीयासाठी दिवस-दिवस रस्त्यावर रांगेत उभे राहावे लागत होते. म्हणून रयत क्रांती संघटना माढा तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खत उपलब्ध करून देण्याची विनंती तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
त्याच्या अनुषंगाने आज उंदरगावमध्ये १० टन युरीया खताचे वाटप करण्यात आले. सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटना कायम कार्यरत आहे. एक तर कोणत्याही पिकांना योग्य भाव मिळेना आणि खत दुकानदार खतांचा तुटवडा दाखवून जास्त पैसे लावून खत विक्री करत आहेत. रयत क्रांती संघटना यापुढेही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सतत कार्यरत राहील. शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचे मत रयत क्रांती संघटनेचे पंडित साळुंके यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे पंडित साळुंके, संतोष कोळी, अमोल तांबीले आदी शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते. रयतक्रांती संघटनेच्या या उपक्रमाचे शेतकरी आभार मानू लागले आहे. सोबतच खत दुकानादार यांच्यावर सरकारने खतांची योग्य प्रकारे विक्री करण्यासाठी चौकशी करावी अशी मागणी शेतकरी करू लागला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील