राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं ऑनलाईन वितरण: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली, २९ ऑगस्ट २०२० : राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विविध खेळाडू, प्रशिक्षक, संस्था यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते ऑनलाईन सोहळ्यात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं; त्यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले ” स्पर्धा, सामुहिक कामगिरी, हार-जीत, संघर्ष हे एखाद्या खेळाप्रमाणेच जीवनाचेही अविभाज्य भाग आहेत. खेळामुळे शारीरिक आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास याबरोबरच जीवनात यशस्वी होण्यासाठीचा मार्ग आणखी प्रशस्त होतो.”

कोविड १९ चा क्रीडा क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे; मात्र खेळाडू आणि या क्षेत्राशी संबंधित अन्य घटकांच्या मानसिक शक्तीच्या आधारे आपण हे संकटही पार करू आणि यशाचा नवा इतिहास रचू; सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून भारत एक क्रीडा महाशक्ती म्हणून उदयाला येईल असा विश्वास राष्ट्रपतीनी यावेळी व्यक्त केला.

या सोहळ्यात राष्ट्रपतींनी राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कारार्थींचा सन्मान केला. या वेळी क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा कार्यक्रम झाला. प्रथमच ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात पुरस्कार विजेते क्रीडापटू ठीकठिकाणहून सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात पुण्याच्या बॉम्बे सॅपर्सचे नायब सुभेदार दत्तू भोकनळ यांना नौकानयन स्पर्धेतील कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा