पुरंदर, दि. ३ जुलै २०२०: कोरोना महामारीच्या संकटामुळे यावर्षी वारकरी बांधवांची पंढरीची आषाढी वारी खंडित झाली. पांडुरंगाचे दर्शनही घेता न आल्याने वारकऱ्यांच्या मनात हुरहूर निर्माण झाली . हि हुरहूर कमी करण्यासाठी पुरंदर तालुका श्री संत सोपनकाका महाराज भागवत संप्रदाय प्रसारक ट्रस्ट सासवडच्या वतीने दिंडीतील पाचशे सदस्यांना घरोघरी जाऊन पंढरीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले, अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हभप ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी यांनी दिली.
कोरोनाची आहे मोठी आपत्ती । पंढरी वारीची झाली अधोगती ।। घरीच बैसोनि करा एकचित्त। आवडी अनंत आठवावा तो श्रीपती ।। आला हो आला पंढरीचा प्रसाद । महिमा आहे तयाचा अगाध ।। सेवन प्रसादाचे भावे करीता ।।
पंढरीच्या वारीला जाता न आल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी बांधव मनातून नाराज झाले. शासनाच्या निर्णय नुसार संतांचे सोहळे लालपरीतून पंढरीला जाऊन पांडुरंगाची भेट झाली. वारकऱ्यांनी घरी राहूनच विठ्ठलाची आराधना केली. वारी चुकली वारकरी पंढरीला जाऊ शकले नाहीत, मग या वारकरी बांधवाना पंढरीचा प्रसाद घरपोच देण्याची संकल्पना ट्रस्टचे सरचिटणीस भोईटेगुरुजी यांनी मांडली. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी हि संकल्पना आमलात आणली.
ट्रस्टचे अध्यक्ष हभप कृष्णांजी देवकर भाऊ, उपाध्यक्ष सदाशिव चिकने, सरचिटणीस ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी, सह सचिव कैलास भोसले, दिंडी चालक जगन्नाथ वारघडे यांनी तालुक्याच्या प्रत्येक गावी जाऊन ५०० सदस्यांना पंढरीच्या प्रसादाचे वाटप केले. या उपक्रमाबद्दक ट्रस्टचे वारकरी बांधवांनी आभार मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे