नवी दिल्ली, २३ जानेवारी २०२३ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज देशातील अकरा मुलांना त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२३ (पीएमआरबीपी) प्रदान केला जाणार आहे. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी ‘पीएमआरबीपी’ विजेत्यांशी संवाद साधतील.
मिळालेल्या माहितीनुसार, आज विज्ञान भवन येथे सकाळी अकरा वाजता होणार्या या कार्यक्रमासाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी, महिला आणि बालविकास राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई आदी उपस्थित असणार आहेत. ‘पीएमआरबीपी’ प्राप्त झालेल्या मुलांमध्ये अकरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सहा मुले आणि पाच मुलींचा समावेश आहे. प्रत्येक विजेत्याला पदक, रोख एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
दरम्यान, कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, शैक्षणिक, समाजसेवा आणि क्रीडा अशा क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना मान्यता मिळणे आवश्यक आहे, अशा बालकांना भारत सरकारतर्फे त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) पुरस्कार प्रदान केला जातो.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.