राज्यात एकाच दिवशी पाठयपुस्तकांचे वाटप, हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा होणार

नंदुरबार, १२ जून २०२३ : जिल्ह्यातील शाळा सुरू होत असून शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तक वाटपाचे नियोजन प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आले असून त्यादृष्टीची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील पाठ्यपुस्तके वितरणाचा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले आहे. त्याचबरोबर बालभारतीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी या वर्षापासून पुस्तकांमध्ये गृहपाठ आणि नोंदीसाठी कोरी पाने दिल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार असून शासनाच्या वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बालभारतीकडून प्राप्त झालेली मोफत पुस्तके शाळांच्या स्तरावर वितरणाला सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाला प्राप्त पुस्तके पहिल्या टप्प्यात तालुका स्तरावर पोहोचविण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात शाळांपर्यंत पुस्तक पोहोचवण्याची लगबग सुरू झालेली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केली जाणार आहेत. यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ही पुस्तक प्राप्त होणार आहेत. त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली असून मराठी आणि उर्दू भाषेतील शाळांनाही पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी नेहमीच चर्चा होत असतात. यावर्षी शासनाच्या वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने जोडल्याने, विद्यार्थ्यांना नोंदी आणि गृहपाठासाठी नवीन वह्यांचे ओझे वहावे लागणार नाही. शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना वेळेवर पाठ्यपुस्तके तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत पाठीवरचे ओझे कमी करण्याचाही निर्णय घेतला आहे. हा निर्णय चांगला आहे. परंतु ग्रामीण भागातील शासकीय शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी ही आता लक्ष दिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पाठ्यपुस्तक वितरणापूर्वी शाळानिहाय वर्गनिहाय माध्यमनिहाय, पंचायत समिती निहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात यावे. सदर पाठ्यपुस्तके वितरणाचा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात याव्या, संपूर्ण जिल्हयात एकाच दिवशी पाठयपुस्तकांचे वितरण होईल, याबाबत तयारी करण्यात यावी. तालुका स्तरावर पुस्तके प्राप्त झाल्यानंतर ते तात्काळ माध्यमनिहाय, इयत्तानिहाय आणि विषयनिहाय संच वर्गीकरण करून घ्यावेत आणि संबंधित शाळांकडे विनाविलंब वितरण करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा