जम्मू-काश्मीर, ५ नोव्हेंबर २०२०: जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया ८ टप्प्यात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात २८ नोव्हेंबरला मतदान होईल, तर शेवटच्या टप्प्यात १९ डिसेंबरला मतदान होईल. मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत असेल. डीडीसी निवडणुका पक्षानुसार होतील.
ही माहिती जम्मू-काश्मीरचे निवडणूक आयुक्त केके शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, डीडीसी निवडणुकीत प्रथमच पश्चिम पाकिस्तानमधील शरणार्थी मतदान करू शकतील. आतापर्यंत हे लोक फक्त लोकसभा निवडणुकीत मतदान करू शकले होते, इतर कोणत्याही निवडणुकीत त्यांना मत देण्याचा अधिकार नव्हता.
निवडणूक आयुक्त केके शर्मा म्हणाले की, कोरोना संक्रमित रूग्ण, वृद्ध आणि अपंगांना टपाल मतपत्रिकेची सुविधा देण्यात येणार आहे. २२ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. डीडीसी प्रभावी व परिणामकारक करण्यासाठी जिल्हा विकास परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्री दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० काढून टाकल्यानंतर ही पहिली मोठी राजकीय क्रिया होणार आहे. अलीकडेच मोदी सरकारने जम्मू-काश्मीर पंचायती राज कायदा १९८९ मधील दुरुस्तीस मान्यता दिली. सुधारित कायद्यानुसार जम्मू-काश्मीरमध्ये त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था लागू केली गेली आहे.
आता जिल्हा विकास परिषद स्थापन होईल आणि लोक थेट आपले प्रतिनिधी निवडतील. जिल्हा विकास परिषदेत जिल्ह्यातील १४ क्षेत्रीय मतदार संघ तसेच विधानसभेचे सभासद व जिल्ह्यातील सर्व ब्लॉक डेव्हलपमेंट काउन्सिलचे अध्यक्ष असतील. एससी, एसटी आणि महिलांसाठीही जागा आरक्षित ठेवल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे