मंगळवेढा तालुक्यात मंडलाधिकारी, तलाठ्याला सरपंचाकडून जीवे मारण्याची धमकी

सोलापूर, दि.२८ मे २०२०: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे वाळू चोरीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मंडलाधिकारी व तलाठ्यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणीपोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पौटच्या सरपंचासह त्यांच्या दोन मुलांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, हुलजंती महसूल मंडलाच्या अंतर्गत येणाऱ्या पौट येथील ओढ्यातून बेकायदेशीररित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असून शिवाय खुद्द गावच्या सरपंचाचा ट्रॅक्टर यात वाळू उपसा करत असल्याची माहिती महसूल खात्यास मिळाली होती. त्यानंतर कारवाईसाठी मंडलाधिकारी सत्यवान घुगे व गाव कामगार तलाठी आर. एल. खोमणे हे येथे गेले. तेव्हा सरपंच राजाराम जगन्नाथ निमगिरे, राहुल राजाराम निमगिरे व प्रविण राजाराम निमगिरी यांच्या ताब्यातील बिगर नंबरचा ट्रॅक्टर व ट्रॉलीतून पौट ते सलगर खुर्द रस्त्यावर निमगिरे वस्ती जवळ वाळू उपसा करत असताना दिसून आले.

कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्यामुळे त्यांनी सदरचा ट्रॅक्टर पोलिस स्टेशनला घेऊन जाण्यास सूचना केली, मात्र सरपंच व त्यांच्या दोन मुलांनी ट्रॅक्टर घेवून जाण्यास विरोध केला. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ट्रॅक्टरची चावी काढून घेतली असता त्यांनी टेस्टरच्या साह्याने ट्रॅक्टर सुरु करून निघून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास सूरु आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा