पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवे घाटात घाणीचं साम्राज्य, पर्यटक आणि प्रवाशांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना

पुणे, दिनांक २१ सप्टेंबर २०२२ : पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवेघाटात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळं हा मार्ग दुर्गंधीच्या विळख्यात अडकलाय. या ठिकाणी कचऱ्याच्या ढीगामध्ये पॅथॉलॉजी लॅब मधील रक्त-लघवीचे नमुने, तपासणीसाठी वापरलेल्या बाटल्या, हॅन्ड ग्लोज, रक्तानं माखलेले सुयांमुळं वन्यजीवांच्या जीवाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झालाय. प्रशासनाने तातडीनं कचरऱ्याची विल्हेवाट लावून येथील स्वच्छता करावी अशी मागणी प्रवासी आणि पर्यटकांकडून होत आहे.

या मार्गावर पुरंदर तालुक्यातील सासवड येथील संत सोपान काका समाधी, नारायणपूर येथील दत्त मंदिर, केतकावळे येथील बालाजी मंदिर, जेजुरी येथील खंडोबा मंदिर, भुलेश्वर मंदिर यासारखी देवस्थाने आहेत त्यामुळं या मार्गाने पर्यटक आणि भाविकांची मोठ्या प्रमाणावर रहदारी असते.

अशातच आता दिवेघाटातील साचलेल्या कचराकुंडी मुळं पर्यटकांकडून आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घाटातील वळणाच्या ठिकाणी पोल्ट्रीचे टाकाऊ साहित्य, खराब झालेली फळे – भाजीपाला, हॉटेलमधील विघटन न केलेला कचरा, मेलेल्या कोंबड्या, अंडी , प्लास्टिक पिशव्या, मृत जनावरं, मुदतबाह्य औषधं, इंजेक्शन, पॅथॉलॉजी लॅब मधील टाकाऊ साहित्य, वापरलेल्या सीरिंज, दारूच्या बाटल्या याचा खच साचला आहे, त्याच्या दुर्गंधीनं दिवेघाटात स्वागत होतं की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नयनरम्य परिसर आणि दिवेघाटातील ढगाळ, पावसाळी वातावरण त्याच बरोबर घाटामध्ये असलेला धबधबा पावसाळ्यात प्रवाहित असतो. यामुळं वर्षा विहार पर्यटनासाठी पर्यटकांची सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मस्तानी तलावाचं मनमोहक दृश्य, हिरवागार शालू नेसलेला दिवेघाट, वाहत्या पाण्याचे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळं पर्यटकांची गर्दी वाढत असल्याचं चित्र आहे.

घाट मार्गामध्ये तुटलेल्या कठड्यावरून कचरा फेकला जात आहे. प्रशासनाने याची तात्काळ दाखल घेऊन, या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. त्याचबरोबर हे कृत्य करणाऱ्यांकडून दिवेघाटातील कचरा स्वच्छ करून घेऊन, दिवेघाट कचरा मुक्त करण्यात यावा. अशी मागणी स्थानिक नागरिकांसह प्रवाशी आणि पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा