रत्नागिरी १४ डिसेंबर २०२३ : कोकणातील ग्रामीण भागात बुधवारी देवदिवाळीचा सण परंपरेनुसार मोठ्या श्रध्देने आणि उत्साहात साजरा झाला. दिवाळीच्या नंतर सुमारे महिनाभराच्या कालावधीनंतर देवदिवाळी साजरी होते. देवदिवाळीला शेतकऱ्यांची दिवाळी म्हणून ओळखले जाते. यादिवशी ग्रामीण भागात शेतकरीवर्गात घरोघरी या उत्सवाची मोठी लगबग असते. शेतकऱ्यांच्या घरांमध्ये देवाच्या नावाने विडे भरण्याचा कार्यकम केला जातो.
हा विडा भरण्याचा कार्यक्रम सामुदायिक तर काही ठिकाणी वैयक्तिक अशा स्वरूपात साजरा झाला. सुुरुवातीला गादी तयार करून त्यावर विडे मांडले जातात. विडे भरतेवेळी गाऱ्हाणे आणि बळीराजाचे स्मरण म्हणून ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ अशी आळवणी शेतकरी करतात. त्यानंतर एकमेकांना विडे वाटप केले जाते. त्यानंतर एक विडा ग्रामदेवतेला अर्पण केला जातो, अशी प्रथा आहे. देवदिवाळीच्या मूर्हूतावर कोकणात ठिकठिकाणच्या देवस्थानच्या जत्रा भरतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर