विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यामातून चांगले काम करा, भारत सरकारचे सह सचिव संकेत भोंडवे यांचे प्रशासकीय यंत्रणांना आवाहन

9

रत्नागिरी ८ डिसेंबर २०२३ : केंद्र शासनाची ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या मोहिमेच्या माध्यमातून सर्व यंत्रणांनी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून चांगले काम करावे,अशी सूचना भारत सरकारचे सह सचिव तथा या मोहिमेचे प्रभारी अधिकारी संकेत भोंडवे यांनी दिली. दूरदृश्यप्रणालीद्वारे या मोहिमेसंदर्भात भोंडवे यांनी आज आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थित होते. तसेच पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सर्व प्रांताधिकारी तहसिलदार आणि गटविकास अधिकारी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करुन या बाबतची सविस्तर माहिती दिली. ९ तालुक्यातील ८४६ ग्रामपंचायतीं मधील १६० लक्ष्यांपैकी १४६ गावांमध्ये ही यात्रा पूर्ण झाली आहे. यासाठी ९ व्हॅन आहेत. लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, सदस्य अशा ३९२ विशेष व्यक्तींचा या यात्रेत सहभाग होता. एकूण २३०हजार ४२८ नागरिकांचा यात सहभाग होता. कालअखेर राजापूर, लांजा, चिपळूण, दापोली, तालुक्यांमधील ग्रामपंचायतीमध्ये यात्रा १०० टक्के पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९१.२५ टक्के यात्रा पूर्ण झाली आहे. प्रभारी अधिकारी भोंडवे यांनी या मोहिमेच्या निमित्ताने योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे चांगले काम करा, केलेल्या कामाची माहिती वेळच्यावेळी ऑनलाईन भरावी. विमा योजनेबाबत बॅंकांच्या व्यवस्थापकांची बैठक घेण्याची सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीनंतर जिल्हाधिकारी सिंह यांनी प्रांताधिकारी तहसिलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. ते म्हणाले, गंभीरतेने या मोहिमेचे काम करा. पंतप्रधान महोदय याबाबत नियोजित जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी उद्याच्या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. त्याच धर्तीवर आपल्या जिल्ह्यातही नियोजन होवू शकणार आहे. त्याची पूर्व तयारीही आतापासून करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर