पाहा चिंदर गावच्या ‘गावपळण प्रथे’चा प्रकार काय आहे?
सिंधुदुर्ग, २६ नोव्हेंबर २०२२ : चिंदर (ता. मालवण) या गावात शुक्रवारी (ता. १८ नोव्हेंबर) ‘गावपळण प्रथा’ साजरी झाली. ‘गावपळण’ म्हणजे गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे तीन ते चार दिवस वेशीबाहेर निघून जातात. तीन ते चार दिवस पुरणारे अन्नधान्य, कपडे, भांडी, पाळीव प्राण्यांसह अख्खे गाव वेशीबाहेर पडते आणि नवीन संसार थाटते.
जुन्या रिवाजानुसार चिंदर गावचे ग्रामस्थ दर तीन वर्षांनी ग्रामदेवतेला कौल लावतात. देवाचा कौल मिळाला, की ‘गावपळणी’चा मुहूर्त ठरतो. ढोल वाजवायला सुरवात होते. गावातील लहान-मोठे सर्वच ग्रामस्थ एवढेच काय, गाई- म्हशींसह सर्वजण गावाच्या वेशीबाहेर जायची तयारी करतात. या काळात घरे, दुकाने, शाळेसह ग्रामपंचायतही टाळे लावून बंद केली जाते. मागील सात ते आठ पिढ्यांपासून चिंदर गावचे ग्रामस्थ ‘गावपळण प्रथा’ पाळत आहेत.
या ‘गावपळणी’साठी तयारीचा भाग म्हणून अगोदरपासूनच
गावाबाहेर माळरानावर तात्पुरता निवारा उभारला जातो. गावाच्या बाहेर झोपड्या उभारल्या जातात, त्यासाठी जमीन स्वच्छ करून सारवली जाते. या जागेवर गवत, लाकडे, गुरांसाठी चारा-पाणी यांची सोय केली जाते. तीन दिवस, तीन रात्री अख्खा गाव वेशीबाहेर असतो. वेशीबाहेर राहुट्यांमध्ये संसार थाटला जातो आणि चुलीवर जेवण केले जाते. या काळात शेतीचे असो किंवा दुसरे कोणतेच काम केले जात नाही. लहान मुले, वयोवृद्ध, चाकरमानी, माहेरवाशिणी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. गावकऱ्यांकडून रात्रभर गाणी, भजन, कीर्तन, संगीत-खुर्ची यांसारखे सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जातात, तसेच महिलही विविध खेळ खेळतात. वर्षभर केलेल्या कामानंतर ग्रामस्थांना या काळात निवांतपणा अनुभवायला मिळतो.
पूर्वीच्या काळात साथीच्या रोगांवर मात करण्यासाठी अशाप्रकारे ‘गावपळण’ केली जायची, असे जुन्याजाणत्या गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ‘गावपळण’ काळात विविध खाद्यपदार्थांचे बेत ठरतात. जेवणाचे एकमेकांना वाटप केले जाते. या तीन-चार दिवसांत गावातील तंटे, वाद एकमेकांशी चर्चा करून मिटविले जातात. तीन दिवस, तीन रात्री खेळ खेळत, गप्पा मारत धम्माल, मौजमस्ती करीत गावकरी घालवतात. या गावची गावपळणची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे.
अर्थात, श्रद्धा आणि अंधश्रद्धेची झालर जरी या ‘गावपळणी’वर असली तरी सलोखा निर्माण करणाऱ्या ‘गावपळणी’ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात हेही तितकेच खरे…
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील