वॉशिंग्टन, २ ऑक्टोंबर २०२०: कोरोनानं सर्वाधिक प्रभावित असलेला देश अमेरिकेमधून आता एक मोठी बातमी समोर आलीय, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसुद्धा याला बळी पडले आहेत. शुक्रवारी सकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं की, ते आणि त्यांची पत्नी मेलानिया कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचं आढळले आहे. चाचणी निकालानंतर दोघांनाही अलग ठेवण्यात आलं आहे.
व्हाईट हाऊसमधील डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक सल्लागार होप हिक्स यांनाही शुक्रवारी कोरोनाची लागण झाली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, होप हिक्स यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता मी व माझ्या पत्नीनं देखील कोरोनाची चाचणी करून घेतली.
आता डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांना पुढील १४ दिवस अलग ठेवणं आवश्यक आहे, आठवड्या नंतर त्यांची पुन्हा कोरोना चाचणी होईल. विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीसाठी केवळ एक महिन्याचाच कालावधी शिल्लक राहिलाय. या काळात डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प लवकरच बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.
महत्त्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं अमेरिकेतील कोरोनाची स्थिती व्यवस्थित न हाताळल्याची टीका केली जात होती. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी बराच काळ मास्क वापरला नव्हता. नंतरच्या काळात त्यांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे