मुंबई, १० फेब्रुवारी २०२३ : शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज शुक्रवार (ता. १०) दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा समाचार घेतला. बीएमसी निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी दिल्ली सोडून मुंबईत राहायला लागले तर आश्चर्य वाटणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक होईपर्यंत ते मुंबईत घर घेऊन राहू शकतात किंवा राजभवनात राहू शकतात. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू होत असताना ते मुंबईत येत असून, अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांच्यासमोर आहेत.
देशाच्या मोठ्या प्रश्नांवर ते मौन पाळतात. मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकणे हे त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे. ‘वंदे भारत’ ट्रेन हे एक साधन आहे. ठीक आहे, आम्हीही तयार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, की राहुल गांधी आणि विरोधकांचा सरळ प्रश्न होता, की सहाशेच्या खाली असलेल्या अदानींमागे कोणती ताकद आहे आणि ते जगात दुसऱ्या क्रमांकावर कसे पोचले? यावर उत्तर देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाचे लोक सभागृहात मोदींचा जयघोष करीत होते. मग मोदी अदानींच्या मागे आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा-पुन्हा मुंबई आणि कर्नाटकला जात आहेत. प्रश्नाचे उत्तर न देता ते इकडे-तिकडे बोलत राहिले, की काँग्रेसने इकडे-तिकडे सरकार पाडले. याचा अर्थ काय, आज तुम्हीही असेच कराल का? किती दिवस जुन्या गोष्टींची पुनरावृत्ती करणार, निदान स्वतःबद्दल तरी सांगा, काय केले?
संजय राऊत म्हणाले, की शिंदे गट आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मुंबई महापालिका जिंकता आलेली नाही. बीएमसी निवडणुकीत शिवसेनेचा विजय अटळ आहे; पण बीएमसी पंतप्रधान मोदींना जिंकायचे आहे. त्यामुळेच अदानींच्या प्रश्नावर मौन पाळत, देशाचे महत्त्वाचे प्रश्न सोडून पंतप्रधान मुंबईत येत आहेत. देशाचे पंतप्रधान आणि लक्ष कुठे आहे, मुंबई महापालिकेत. यावरून भाजप आणि शिंदे गटाचे सर्व नेते आम्हाला आव्हान देण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट होते. त्यांच्यात हिंमत नाही. त्यामुळे ते पंतप्रधान मोदींना वारंवार मुंबईत बोलावत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड