मुंबई, 2 जानेवारी 2022: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. अशा स्थितीत सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. एकीकडं विरोधकांकडून एकमेकांवर शब्दांतून निशाणा साधला जात असताना दुसरीकडं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी अमित शहांबाबत वक्तव्य केलं आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव म्हणाले की, सध्या असे अनेक नेते आहेत जे निवडणुकीच्या वेळी सर्वसामान्यांना चंद्र-ताऱ्याची आश्वासने देतात आणि नंतर आश्वासने विसरतात. तुम्ही चंद्र-ताऱ्यांचं आश्वासन दिलं, असे लोक विचारतात तेव्हा हे नेते म्हणतात की, निवडणुकीच्या वेळी अशा गोष्टी बोलल्या जातात. मात्र शिवसेनेचे तसे नाही. ते कधीही पूर्ण न होणारी आश्वासनं देणार नाहीत.
ते म्हणाले की, शिवसेना प्रमुखांनी आम्हाला असं शिकवलं आहे की, खोटं बोलू नका आणि जमेल तेवढंच आश्वासन द्या. फक्त निवडणूक जिंकण्यासाठी खोटं बोलू नका. हाच वारसा शिवसेना चालवत आहे. तुम्ही आश्वासनं पाळली नाहीत तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, येत्या काही दिवसांत गरज पडली तर मी कोरोनाच्या परिस्थितीवर बोलेन. काळजी करू नका आम्ही परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहोत. फक्त तुमचा पाठिंबा आमच्या सोबत ठेवा. उद्धव ठाकरे अनेक अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलत होते.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्कादायक माहिती दिलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं की, राज्यातील 10 मंत्र्यांसह 20 हून अधिक आमदार तपासात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात कोविडची प्रकरणे अशीच वाढली, तर सरकार आणखी कठोर निर्णय घेऊ शकतं.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे की, कोरोनाचा वेग पाहता जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात दोन लाख सक्रिय रुग्ण होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात ओमिक्रॉनचे 454 रुग्ण आहेत. शुक्रवारी राज्यात कोरोनाचे 8067 नवीन रुग्ण आढळून आले, तर ओमिक्रॉन या नवीन प्रकाराचे चार नवीन रुग्ण आढळून आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे