मुंबई, २२ सप्टेंबर २०२०: ”मालिकांच्या चित्रीकरणादरम्यान सरकारनं ठरवून दिलेले ”कोविड प्रोटोकॉल्स” पाळले जात नसेल तर अशा मालिकांच्या चित्रीकरणाला आम्ही विरोध करू” असा जाहीर इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आणि मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिलायं. मंगळवारी ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावंकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. त्यामुळेच मालिकांच्या चित्रीकरणादरम्यान कोविड नियम पाळले गेले नाहीत का? असा प्रश्न विचारला जातोय.
देशासह राज्यात कोरोना रुग्ण झपाट्यानं वाढतायत. मात्र अर्थव्यवस्थेचे चक्र फिरते राहण्यासाठी सरकारनं कोरोनाबाबतचे नियम आणि अटी लागू करत अनेक व्यवसायांना सुरु करण्याची मुभा दिली. कोरोनाचा संसर्ग न होऊ देता काम करण्यासाठी सरकारनं सिनेसृष्टीलाही कोविड प्रोटोकॉल्ससह चित्रीकरणाला परवानगी दिली आणि बॉलीवूड चित्रपटांसह अनेक मालिकांच्याही चित्रीकरणाला सुरुवात झाली. मात्र आई माझी काळूबाई या मालिकेच्या सेटवर २७ जणांना कोरोनाची लागण झाली. या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांनाही कोरोनाची लागण झाली होती. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यामुळेच चित्रीकरणादरम्यान कोविड नियम शिस्तीने पाळले गेले नाहीत असं बोललं जातंय.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज एक परिपत्रक काढत मराठी आणि हिंदी वाहिन्यांच्या संचालकांना आणि मालिकांच्या निर्मात्यांना जाहीर इशारा दिला आहे. मराठी आणि हिंदी मालिकांचे संचालक आणि निर्माते कोविड प्रोटोकॉल्स गांभीर्याने घेत नाही अशी त्यांनी व्यक्त केली. चित्रीकरणाच्या सेटवर कोविड प्रोटोकॉल्सचे सर्वतोपरी पालन करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे असंही ते म्हणाले. कोविड प्रोटोकॉल्सबाबत कोणतीही तडजोड किंवा हलगर्जीपणा केल्यास अभिनेता आणि तंत्रज्ञ यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे कोविड प्रोटोकॉल्स न पाळणाऱ्या सर्व मालिकांच्या चित्रीकरणाला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना ठामपणे विरोध करेल असा इशारा अमेय खोपकर यांनी वाहिन्यांच्या संचालकांना आणि मालिकांच्या निर्मात्यांना दिलायं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे.

