सोलापूर जिल्ह्यातील कामगारांचा अंत पाहू नका: डॉ.गोवर्धन सुंचू

सोलापूर, दि.१० जून २०२०: महापालिका आयुक्त विडी कामगारांना घरोघरी जाऊन विड्या गोळा करण्यास व पान-तंबाखू देण्यास सांगत आहेत. परंतु तसे शक्यच नाही. उलट गल्लीबोळात कामगारांची गर्दी जमून रोगराईस आमंत्रण दिल्यासारखे होईल. प्रत्येक विडी कामगाराच्या घरात काम नाही व सध्या घरातील धान्य पूर्णपणे संपलेले आहे.

त्यामुळे घरात मरण्यापेक्षा रस्त्यावर मेलेले बरे, असे ठरवून विडी कामगार आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत आहेत. त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असे आवाहन राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ. गोवर्धन सुंचू यांनी प्रशासनास केले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून विडी कारखाने बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. त्यामुळे कारखाने चालू करावेत, यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने गेल्या आठवड्यापासून घरोघरी विडी कामगार चक्री उपोषण करीत आहेत. मंगळवारी सकाळी न्यू पाच्छा पेठ येथे डॉ. गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनची सुरूवात करण्यात आली. त्या वेळी डॉ. सुंचू बोलत होते.

यावेळी डॉ. सुंचू म्हणाले की , प्रशासनाने त्वरित विडी कारखाने सुरू करण्याची परवानगी द्यावी व कामगारांना त्यांच्या घरीच काम द्यावे. प्रतिबंधित क्षेत्रातील विडी कामगारांना कारखानदारांनी त्वरित दोन हजार रुपये आर्थिक मदत द्यावी.

राज्य शासनाकडून खास बाब म्हणून प्रत्येक विडी कामगाराला मोफत २५ किलो तांदूळ, २५ किलो गहू, दोन किलो तूरदाळ, दोन किलो तेल आदी जीवनावश्यक वस्तू त्वरित वितरित कराव्यात. कारखाने त्वरित सुरू न केल्यास राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने चक्री उपोषण थांबवून प्रत्येक भागात धरणे आंदोलन, निदर्शने करण्यात येतील.

वेळप्रसंगी आमरण उपोषण करण्यात येणार आहे.या वेळी सत्यनारायण बल्ला, अरविंद कस्तुरी, लक्ष्मीनारायण येलदी, विजया आडेप, शारदा गुंडेटी, लक्ष्मी नल्ला आदींसह महिला विडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा