डॉ. राहुल वेलदोडे यांच्या हस्ते ‘स्मृतिरंग ७५’च्या ‘पुष्प १६’चे उद्घाटन

चिंचवड, ११ जानेवारी २०२३ : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारती, पिंपरी-चिंचवड समितीचे चित्रशिल्पहस्त कला विभागप्रमुख श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांच्या कल्पनेतून स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती दिलेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतींना आपल्या कलेद्वारे अभिवादन करण्याचे योजिले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरांतील कमीत कमी ७५ कलासाधक आपली कला रसिकांसमोर प्रदर्शित करतील, अशी अपेक्षा होती. तथापि, कलासाधकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘स्मृतिरंग ७५’ हे प्रदर्शन १०० पेक्षा अधिक कलासाधकांच्या सहभागाने संपन्न होणार आहे.

‘स्मृतिरंग ७५’ (पुष्प १६) या पिंपरी-चिंचवड परिसरातील ७ कलाकारांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (ता. १०) सायंकाळी सहा वाजता डॉ. श्री. राहुल वेलदोडे, कलाध्यापक, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट्स यांच्या शुभहस्ते झाले. डॉ. राहुल वेलदोडे, सहभागी कलासाधक व संस्कार भारतीच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यानंतर ‘संस्कार भारती’चे ध्येयगीत सादर केले. डॉ. राहुल वेलदोडे यांचे स्वागत ‘संस्कार भारती’, पिंपरी-चिंचवड समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर व चित्रशिल्पहस्त कला विभागप्रमुख श्री. योगेश दीक्षित यांनी केले.

सहभागी कलाकार- १) श्री. अनिरुद्ध मोकाशी, २) सौ. अश्विनी पटवर्धन, ३) सौ. रती देशमुख, ४) सौ. सायली पिंगट, ५) धनश्री पाटील, ६) आर्यन कांबळे व ७) शिवराज माने यांना प्रदर्शनाचे उद्घाटक डॉ. राहुल वेलदोडे यांचे हस्ते पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. राहुल वेलदोडे यांनी मनोगत व्यक्त करताना ‘संस्कार भारती’ची उद्दिष्टे व पी. एन. गाडगीळ अँड सन्स यांची साथ कलासाधकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. ‘संस्कार भारती’चे अनुभवी कलासाधक–पदाधिकारी नवोदितांना प्रोत्साहन देतात ही खरोखरच कौतुकास्पद बाब असल्याचे नमूद केले व सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

‘पी. एन. गाडगीळ ॲंड सन्स’च्या कलादालनात झालेल्या कार्यक्रमास कलासाधक व कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीचे चित्रशिल्पहस्त कला विभागप्रमुख श्री. योगेश दीक्षित यांनी ‘संस्कार भारती’च्या कार्याचा व सर्व विभागांच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. कलासाधक श्री. भाग्येश अवधानी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कलासाधक श्री. संतोष देवे यांनी आभार मानले.

‘स्मृतिरंग ७५ ( पुष्प १६) हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. १५) सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत पी. एन. गाडगीळ कलादालन, चिंचवडगाव येथे विनामूल्य खुले आहे. प्रदर्शनात कलाकारांच्या विविध माध्यमातील सुंदर कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. तरी जास्तीत जास्त कला रसिकांनी प्रदर्शनास भेट देऊन स्वातंत्र्याच्या स्मृतींमध्ये रंगून जावे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा