पुणे, १७ जानेवारी २०२३ : उदगीर (जि. लातूर) येथील डॉ. ना. य. डोळे फाउंडेशनतर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार’ यावर्षी सुप्रसिद्व चित्रपट, टीव्ही मालिका निर्माते व राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे. रविवारी (ता. पाच फेब्रुवारी) उदगीर येथे होणाऱ्या कार्यक्रमात आमदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या माध्यमातून परिवर्तनवादी समाजनिर्मितीसाठी प्रबोधन करणे, या कार्यासाठी वैद्य यांची फाउंडेशनच्या निवड समितीतर्फे निवड करण्यात आली आहे, अशी माहिती फाउंडेशनचे सचिव अजित शिंदे यांनी शनिवारी उदगीर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. ना. य. डोळे हे उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ३५ वर्षे प्राचार्य होते. त्यांनी उदगीर परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या हजारो गोरगरीब, कष्टकरी विद्यार्थ्यांना वैचारिक वारसा दिला. डॉ. डोळे हे महाराष्ट्रातील प्रमुख समाजवादी कार्यकर्ते, विचारवंत आणि राज्यशास्त्र विषयाचे प्रकांड पंडित म्हणून ओळखले जात. १४ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. डॉ. ना. य. डोळे फाउंडेशनतर्फे उदगीर येथे दरवर्षी ‘डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार’ देण्यात येतो. मागील दोन वर्षे कोरोना काळामुळे पुरस्कार वितरणात खंड पडला होता.
यावर्षी पुरस्काराचे मानकरी नितीन वैद्य हे ठरले आहेत. नितीन वैद्य यांनी ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, आणि ‘सोनी मराठी’वरील ‘क्रातिज्योती’ या दोन मालिकांद्वारे फुले, आंबेडकरी विचार समाजामध्ये रुजविला. वैद्य यांचा मूळ पिंड चळवळीचा असून ते बालपणापासून राष्ट्र सेवा दलाचे सैनिक आहेत. त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून यावर्षीच जबाबादारी स्वीकारली आहे, असे यावेळी सांगण्यात आले. या प्रसंगी फाउंडेशनचे विश्वस्त अजित शिंदे, अंकुश गायकवाड, बापूसाहेब कज्जेवाड, मोतीलाल डोईजोडे, ओम गांजुरे, जशन डोळे, विनायक चाकुरे आदी उपस्थित होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील