औरंगाबाद, १३ जानेवारी २०२३ : १४ जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळ्याला मराठवाड्यात वेगळं महत्त्व प्राप्त असून, उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २९ वा नामविस्तार दिन आहे. नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यापीठ प्रवेशद्वारावर विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. यादरम्यान आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटनांसह सर्वपक्षीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावले आहेत.
कोरोना काळानंतर यावर्षी होणाऱ्या नामविस्तार दिनाला डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. त्यादृष्टीने नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यापीठ परिसरामध्ये विद्यापीठ गेटवर, तसेच आसपासच्या परिसरामध्ये तयारी जोरात सुरू आहे. त्यासोबतच सर्व पक्ष, संघटनांकडूनही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे; तसेच मोठ्या संख्येने पुस्तक विक्रेतेही आपला स्टॉल लावण्यासाठी या परिसरामध्ये जमा झाले आहेत.
दरम्यान, औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला नामांतर करण्यासाठी आंदोलन करण्यात येत होती; मात्र हे केवळ आंदोलन नव्हते, तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरूप आले होते. अनेक पुरोगामी संघटना आणि व्यक्तींचा या लढ्याला सक्रिय पाठिंबा मिळत होता. विरोधकही गप्प नव्हते. तेही दंड थोपटून उभे ठाकले होते. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी सुमारे १७ वर्षे लढा द्यावा लागला. त्यानंतर वर्ष १९९४ मध्ये ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामांतर झाले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनाले