पुणे, ५ मे २०२३: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) एका शास्त्रज्ञाला महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून अटक केली. शास्त्रज्ञावर आरोप आहे की, तो पाकिस्तानी एजंटला गुप्तचर माहिती देत होता. प्रदीप कुरुलकर असे या डीआरडीओ शास्त्रज्ञाचे नाव आहे. डीआरडीओच्या या शास्त्रज्ञाला पाकिस्तानी एजंटने हनीट्रॅपमध्ये अडकवले होते. यानंतर प्रदीपने डीआरडीओशी संबंधित माहिती त्यांच्यासोबत शेअर करण्यास सुरुवात केली. डीआरडीओचा हा शास्त्रज्ञ पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात असल्याचे आणि हे प्रकरण हनीट्रॅपचे आहे, असे महाराष्ट्र एटीएसने सांगितले.
महाराष्ट्र एटीएसने सांगितले की, शास्त्रज्ञाने आपल्या पदाचा गैरवापर केला आणि संरक्षण संबंधित माहिती शत्रू पाकिस्तानी एजंटला दिली. सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असूनही शास्त्रज्ञाने डीआरडीओशी संबंधित माहिती पाकिस्तानी एजंटशी शेअर केली.
महाराष्ट्र एटीएसने सांगितले की, अटकेनंतर शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट १९२३ आणि त्याच्याशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड