श्री सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू: भाविकांसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

77

पुणे २८ जानेवारी २०२५ :मुंबईतील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. भक्तांच्या भावना आणि मंदिराच्या सात्त्विक वातावरणाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आठवड्यापासून तोकडे आणि असभ्य कपडे घालून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारला जाणार आहे.

मंदिर न्यासाचे सदस्य राहुल लोंढे यांनी सांगितले की, “अनेक भाविकांकडून मंदिरात अनुचित पेहरावांबाबत तक्रारी मिळाल्या होत्या. काही भाविकांचा पोशाख इतर भक्तांसाठी संकोच निर्माण करणारा असतो. त्यामुळे मंदिराचा पवित्र भाव जपण्यासाठी योग्य कपडे घालून येण्याची अपेक्षा ठेवण्यात आली आहे.”

विशेष म्हणजे, ड्रेस कोडसाठी कोणतेही कठोर नियम लागू करण्यात आलेले नाहीत. परंतु, भक्तांनी साधे, सुसंस्कृत आणि भाविकतेला साजेसे कपडे घालूनच दर्शनासाठी यावे, असे आवाहन मंदिर न्यासाने केले आहे.

याशिवाय, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मंदिर परिसरात प्लास्टिकवरही संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय मंदिर परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

भाविकांनी या नव्या नियमांचे स्वागत केले असून, मंदिराचा सात्विक भाव आणि पवित्रता जपण्यासाठी हे पाऊल अत्यंत योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी या नियमांचे पालन करून दर्शनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंदिर न्यासाने केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे