ट्रॅव्हल्स बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाली पलटी, चाळीसगाव तालुक्यातील दुर्घटना

चाळीसगाव २८ नोव्हेंबर २०२३ : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे नजीक, अहमदाबाद (गुजरात) येथून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. या दुर्घटनेत तीन प्रवाशी जखमी झाली असून सुदैवाने बस पलटी झाली त्याठिकाणी जास्त खोल भाग नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून खाजगी बस अहमदाबाद (गुजरात) येथून औरंगाबादच्या दिशेने जात होती. दरम्यान आज सकाळी बस मेहुणबारे (ता. चाळीसगाव) गावाजवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने गावाजवळील गिरणा पुलाच्या जवळच्या जुन्या मोरावर बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली.

या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नसून यात बसमधील तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस स्टेशनचे विष्णू आव्हाड यांच्यासह त्यांची टीम तसेच महामार्ग पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

न्युज अनकट प्रतिनीधी : डॉ पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा