अकोला येथे इंधनाने भरलेला टॅंकर चालवत असतानाच चालकाला हृदयविकाराचा झटका

पुणे, २० जानेवारी २०२३ : अकोला शहरात कारागृहासमोर उड्डाणपुलावरून पेट्रोल-डिझेल इंधनाने भरलेला टँकर जात असताना अचानक चालकाला हृदयविकाराचा झटका आला. चालक बेशुद्ध झाल्याने टँकर अनियंत्रित होऊन वेगाने उताराच्या दिशेने आला आणि दुभाजकावर धडकला. ट्रकच्या मागे एकही वाहन नसल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. चालकाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माणिकराव रामराव महिंद्रे (वय ५५, रा. रविनगर, अमरावती) असे मृत चालकाचे नाव आहे.

माणिकराव महिंद्रे हे टँकर (एमएच- २७, एक्स- ५१३४) घेऊन गायगाव येथे गेले. सहा हजार लिटर पेट्रोल व सहा हजार लिटर डिझेल या टँकरमध्ये भरून अमरावतीच्या दिशेने ते गुरुवारी दुपारी निघाले होते. अकोला शहरातील अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलावरून दर्यापूर मार्गे ते अमरावती गाठणार होते. उड्डाणपुलावर टँकर चढत असताना २०० फूट वर गेला. त्याच वेळी अचानक माणिकराव महिंद्रे यांना हृयविकाराचा झटका आला. त्यामुळे टँकर अनियंत्रित होऊन वेगाने मागे घेऊन दुभाजकावर आदळला. टँकर पूर्ण इंधनाने भरलेला होता. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ऑटोचालकांनी टँकरचालक महिंद्रे यांना सर्वोपचार रुग्णालयात नेले. तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा