इंदापूर, दि. ५ ऑक्टोबर २०२०: महामार्गावर अथवा इतर ठिकाणच्या रस्त्यांवर वाहन चालवताना चालकांनी आपल्या वाहनांच्या वेगवेगावर नियंत्रण ठेवावे, आपल्या घरी आपले कुटुंब वाट पहात आहेत. त्यांचा विचार करून वाहतुकीचे नियम लक्षात घेवूनच वाहन चालवावे असे इंदापूर महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर मुठेकर यांनी सांगितले.
सोनाई दुध सहकारी वाहतूक संस्थेच्या १०० वाहन चालकांना वाहन सुरक्षा अभियानाअंतर्गत सोनाई परिवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने वाहन सुरक्षा अभियान व प्रबोधन यावर मार्गदर्शन सोमवार (दि. ५ ऑक्टोबर) रोजी इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील सोनाई डेअरीच्या प्रशासन सभागृहात प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंकर मुठेकर बोलत होते.
यावेळी सोनाईचे मुख्य कार्यकारी संचालक विष्णुकुमार माने, तज्ञ संचालक अतुल माने, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे, नानासाहेब चांदणे, सचिव सागर शिंदे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले, उपाध्यक्ष संदीप सुतार, इंदापूर तालुका संघटक भिमराव आरडे, गोकुळ टांकसाळे, रामदास पवार, उदयसिंह देशमुख, शिवकुमार गुणवरे, प्रेस फोटोग्राफर अक्षय आरडे, राजेंद्र भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना शंकर मुठेकर म्हणाले की, वाहन चालक अनेक वेळा उजव्या बाजूने आपली वाहने चालवतात, त्यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघण केले जाते. त्यामुळे वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांना ऑनलाईन दंड टाकावा लागतो. त्यामुळे आपल्या वाहन मालकांना तो दंड सोसावा लागतो. त्याचवेळी आपण वाहतुकीचे नियम पाळून आपण वाहन चालविल्यास आपला दंड वाचू शकतो.
यावेळी मुठेकर यांनी चालकांना वाहतूक नियमांची संपूर्ण माहिती दिल्यानंतर, चालकांना इंटरसेप्टर वाहनाची सखोल माहिती दिली. त्यानंतर रस्त्यावर जावून ज्या वाहनांना मागे पुढे रिफ्लेक्टर नाही त्यांना लाल, पिवळे व पांढरे रिफ्लेक्टर पट्ट्या लावण्यात आल्या.
यावेळी सोनाई वाहतूक संस्थेचे व्यवस्थापक दीपक सातव, संजय मचाले, वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार मच्छिंद्र माने, पोलीस नाईक संतोष काळे, नाथा गळवे आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट: प्रतिनिधी निखिल कणसे.

