पालकमंत्र्यांच्या शेतातील बिबट्यांचा ड्रोनने शोध

लातूर, दि.३ मे २०२०: बाभळगाव येथे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शेतात बिबट्यांच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत वनविभागाला माहिती दिली असता, वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी २ पिंजरे लावले आहेत. शिवाय, ड्रोनचीही मदत घेतली आहे.
आज (रविवारी) पहाटे ५.३० ते ६ च्या दरम्यान लातूर, निलंगा रस्त्यावर दोन बिबटे खेळत असल्याचे शेतकऱ्यांना दिसले. भुसणीमार्गे येणारे वाहनचालक बिबट्याला पाहून माघारी पळाले तर बाभळगावातील शेतकऱ्यांनीही पळ काढला.

बाभळगावात बिबट्या दिसला, असा दूरध्वनी रविवारी पहाटे ६ वाजता लातूर ग्रामीण पोलिस चौकीत आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वन विभागालाही कळविण्यात आले.
वन विभागाची २० जणांची तुकडी तातडीने बाभळगावात पोहोचली. त्यांना या भागात रस्त्यावर, शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. त्यामुळे त्यांनी तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी या भागात २ पिंजरे लावले. हे बिबटे गेल्या आठ दिवसांपासून भुसणी बॅरेज, साई डेअरी फार्म व बाभळगाव परिसरात फिरत असल्याची चर्चा आहे.

पालकमंत्र्यांच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. या भागात ऊस आणि बांबूची शेती आहे. बिबटे उसात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या भागात आम्ही एक पिंजरा उसात तर दुसरा पिंजरा बांबूच्या शेतात लावला आहे. बिबटे पळाल्याची माहिती असल्याने दोन पिंजरे लावण्यात आला आहेत. आम्ही सकाळपासून या भागात गस्त घालत आहोत. बिबट्याच्या शोधासाठी ड्रोनची मदत घेतली आहे. या ड्रोनद्वारे बिबट्याची शोध मोहीम सुरु केली आहे. बिबट्या असल्याचे आम्हाला प्रथमदर्शनी दिसत आहे.

बाभळगावसह पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहावे. या संदर्भात वन विभागास कळविण्यात आले आहे. वन विभागाने बिबट्यांना पकडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. बिबट्यांना पकडेपर्यंत परिसरातील महिला, लहान मुलांनी घरातच राहावे, असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा