नाशिक, १२ जून २०२३: भारत सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग्जमुक्त भारत’ चा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने नाकोटिक्स कंट्रोल ब्युरोने दि. १२ ते २६ जून या कालावधीत नशामुक्त भारत पंधरवडा जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात पंधरवड्याचे नियोजन करण्यात आले आहे. नशामुक्त भारतचे स्वप्न साकारण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.
अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत व धोक्याविरुद्ध लढण्यासाठी जनजागृती निर्माण करणे हा या नशामुक्त भारत पंधरवडा कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाकडून आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवनविरोधी दिनाचे औचित्य साधून जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा आदी उपक्रम घेतले जाणार आहेत. या उपक्रमाची जबाबदारी सचिव सुमंत भांगे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे.
राज्यात नशामुक्त भारत पंधरवडा अंतर्गत समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व सहायक आयुक्त, समाजकल्याण हे नशामुक्त भारत अभियान समिती व व्यसनमुक्ती केंद्राच्या साह्याने समयबद्ध कार्यक्रम घेणार आहेत. लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाने जनजागृती करण्याच्या सूचना सचिव भांगे यांनी समाजकल्याण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना ऑनलाइन बैठकीद्वारे दिल्या आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर