अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुंबई गुन्हे शाखेकडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त

मुंबई, १८ ऑगस्ट २०२३ : मुंबई गुन्हे शाखेने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ७१ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आलीय. आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. गुन्हे शाखा युनिट सहा ने ही कारवाई केली. या कारवाईत ३५० ग्रॅम मेफेड्रेन आणि ४५ ग्रॅम जप्त चरस करण्यात आले आहे. यासोबतच आरोपींकडून १७.८९ लाख रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखा युनिट सहाला खबर मिळाली होती की, काही लोक ड्रग्सचा मोठा साठा घेऊन मुंबईत प्रवेश करणार आहेत. त्या अनुषंगाने मुलुंडजवळ सापळा लावण्यात आला आणि संशयतांची गाडी दिसताच पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी गाडीतून तसेच आरोपींच्या घरातून ३५० ग्रॅम मेफेड्रोन आणि ४५ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. नऊपैकी तीन आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार असून काहींवर अंमली पदार्थ संबंधित गुन्हे देखील दाखल आहेत.

या संपूर्ण प्रकरणात आरोपी मध्ये एका महिलेला देखील अटक करण्यात आलेली आहे. त्या महिलेचे नाव सना साबीर अली खान उर्फ प्रियांका अशोक कारकवर आहे. या महिलेकडे दोन आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे मिळालेले आहेत. पोलीस या महिलेसंदर्भात अधिक तपास करत आहेत. आरोपी मुंबईमध्ये भाड्याने घर घेऊन राहत होते, प्रामुख्याने ड्रग्स सप्लाय करणे किंवा पोहचवणे त्यांचे काम होते. मात्र या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखीन कोण आहे किंवा त्यांच्या मास्टरमाइंड कोण आहे या संदर्भात पोलीस तपास करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा