मुंबई, १० जून २०२३ : मुंबई एनसीबीने डोंगरी परिसरात मोठी कारवाई करत ५० कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने मागील काही दिवसात केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. डोंगरी परिसरात ड्रग्स बाबतच्या अनेक मोठ्या कारवाया मुंबई पोलीस आणि एनसीबीकडून करण्यात आल्या आहेत. परंतु एनसीबीने काल केलेली ही कारवाई पाहता या कारवाईनंतर काही कनेक्शन्स उघड होण्याची शक्यता आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईत ५० कोटी किमतीचे २० किलो एमडी ड्रग्स, १ कोटी १० लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एनसीबीने एकूण तीन आरोपींना अटक केली असून, आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
या प्रकरणात आरोपी महिला मास्टरमाईड असल्याचे बोलले जात आहे. ए ए शेख असे महिला आरोपीचे नाव आहे. एनसीबीचे विभागीय संचालक अमित घवाटे यांच्या नेतृत्वात डोंगरीतिल ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. याआधी एकदा एनसीबीने अशीच एक मोठी कारवाई डोंगरी परिसरात केली होती. या कारवाई मध्ये दाऊद टोळीशी संबंधित लोकांना अटक झाली होती.
एनसीबीचे विभागीय संचालक अमित घवाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक मोठे सिंडिकेट असून यातील कनेक्शन तपासले जात आहेत. आरोपींवर याआधीही असे गुन्हे दाखल असण्याची शक्यता असून, एनसीबीकडून त्याची पडताळणी केली जात आहे. या केसमध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे का हे आताच सांगता येणार नाही. एमएमआर रिजनमध्ये हा सगळा ड्रग्सचा पुरवठा केला जात होता. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी अनिल खळदकर