पिंपरी-चिंचवड, ८ ऑक्टोबर २०२०: काल बुधवार ७ ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील चाकण परिसरात २० कोटी रुपयांचे ड्रग जप्त करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सध्या संपूर्ण देशभरात ड्रग प्रकरणावरून भरपूर चर्चा होताना दिसतेय. सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी बॉलीवूड मधील ड्रग साखळी जोडलेली. यानंतर अनेक जण या साखळीत सापडले. सापडलेले हे ड्रग देखील बॉलिवूडशी संबंधित असू शकतात अशी शंका व्यक्त केली जात आहे. अमली पदार्थ विरोधी पथकानं पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील हे २० कोटींचे मेफड्रॉग ड्रग जप्त केलेत. बुधवारी दुपारी ही कारवाई केली गेली असून यात पाच जणांना अटक करण्यात आलंय.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाला पिंपळगाव येथे विक्रीसाठी हे ड्रग जाणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीप्रमाणं पोलिसांनी सदर भागात सापळा रचला होता. यावेळी पाच जणांना अटक करण्यात आली. त्यासह २० कोटींचे मेफड्रॉग ड्रग जप्त केले. कारवाई दरम्यान ५ लाखांची चार चाकी वाहन देखील जप्त करण्यात आली. त्याचबरोबर तेवीस हजार शंभर रुपये अशी रोकड देखील जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण २० कोटी ५ लाख २३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, चेतन फक्कड दंडवते (वय २८, रा. मलठण जि. पुणे), आनंदगीर मधूगीर गोसावी (वय २५, रा. रुखईखेडा, जळगाव), अक्षय शिवाजी काळे (वय २५, रा. पाचर्णे मळा, जि. पुणे), संजीवकुमार बन्सी राऊत (वय ४४, रा. झारखंड (सध्या नोएडा), तौसिफ हसन मोहम्मद तस्लिम (वय ३१, रा.बिहार (सध्या नोएडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींकडे चौकशी केल्यानंतर यातील संजीवकुमार राऊत आणि तौसिफ तस्लिम हे नोएडा येथून विमानाने पुण्यात आले होते. त्यानंतर पाचही आरोपी एकत्र आले आणि २० किलो मेफेड्रोन ड्रग्ज विक्रीसाठी निघाले होते. दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांना अटक केली. हे आरोपी ज्या केमिकल फॅक्टरीमध्ये कामाला होते तिथे हे मेफेड्रोन ड्रग्ज बनवले जात होते, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे