नवी दिल्ली, ८ जानेवारी २०२१: देशातील कोरोना लसीकरण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आज ८ जानेवारी रोजी सर्वात मोठी रंगीत तालीम होणार आहे. आज देशातील सर्व ७३६ जिल्ह्यात ड्राय रन करण्यात येणार आहे. यामध्ये, लोकांना कोरोना लस कशी लागू करावी याविषयी, त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे याबद्दलची तयारी केली जाणार आहे.
यापूर्वी, २८ आणि २९ डिसेंबर रोजी ४ राज्यांत दोन दिवस ड्राय रन घेतली गेली. यानंतर २ जानेवारी रोजी सर्व राज्यात ड्राय रन घेतली गेली आणि आता ३३ राज्यात (हरियाणा, हिमाचल आणि अरुणाचल वगळता) आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुन्हा ड्राय रन केली जात आहे.
ड्राय रन बाबत गुजरात, पंजाब, आसाम आणि आंध्र प्रदेशात चांगले निकाल समोर आले. यानंतर सरकारने ड्राय रन देशभर राबविण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा केंद्र सरकार संपूर्ण देशात ड्राय रन चालवणार आहे.
तत्पूर्वी, गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत आढावा बैठक घेतली. राज्याचे आरोग्यमंत्री आणि मुख्य अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत हर्ष वर्धन यांनी लसीविरूद्ध चुकीची माहिती पसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि असे म्हटले की यामुळे लसीकरणाच्या तयारीला अडथळा निर्माण होऊ शकतो.
पुढील आठवड्यात लसीकरण सुरू होऊ शकते
येत्या आठवड्यापासून देशातील लसीकरण कार्यक्रमास प्रारंभ होऊ शकतो. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, लसीकरण कार्यक्रम कोरोना लसीच्या मंजुरीनंतर १० दिवसानंतर सुरू होऊ शकेल. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासंदर्भात डीसीजीआयने ३ जानेवारी (रविवारी) मान्यता दिली. या संदर्भात, देशात कोरोना लसीकरण कार्यक्रम १३ किंवा १४ जानेवारीपासून सुरू होऊ शकेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे